मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे नेते व प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 संदर्भात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2020 मध्ये NEP अंमलबजावणीसाठी 19 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने अहवाल तयार केला होता.
हर्षल प्रधान म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी हा अहवाल स्वीकारला खरा, पण त्याचा अर्थ असा नव्हता की सर्व शिफारसी अंमलात आणल्या जातील. केवळ योग्य आणि राज्याच्या हिताच्या शिफारसीच लागू करण्यात येणार होत्या.”
ते पुढे म्हणाले, “भाजप सध्या केवळ राजकीय हेतूने या अहवालातील एकाच मुद्द्याचा – म्हणजे हिंदी शिकवण्याच्या शिफारशीचा – वापर करून मराठी जनतेची दिशाभूल करत आहे. अहवालातील इतर महत्त्वाच्या शिफारसींचा भाजपाला विसर पडला आहे.”
हर्षल प्रधान यांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटले, “भाजप केवळ उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी अस्मितेचा बडगा उचलून ते हिंदी सक्तीचा आभास निर्माण करत आहेत, पण राज्यातील जनतेने त्यांचा हा राजकीय डाव ओळखला आहे.”
“भाजपाला उद्धवसाहेबांची भीती वाटते हेच सत्य आहे. आणि म्हणूनच – ‘ये डर अच्छा है!’” असे मत हर्षल प्रधान यांनी मांडले.