मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल ८९ नगरसेवक निवडून आल्याने आत्मविश्वासात वाढ झालेल्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईच्या महापौर पदावर तडजोड करू नये, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती भाजपच्या प्रदेशातील विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे.
असे झाल्यास महापौर पदाकडे आशेने पाहणारे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपच्या नेत्यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या महापौरपदी भाजपचा उमेदवार असावा अशी इच्छा होती. मात्र, गेल्या २५ वर्षांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप-शिवसेना युतीमुळे प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून येत असल्याने, महापौर व स्थायी समिती अध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेलाच द्यावी लागत होती.
याला एकमेव अपवाद होता तो २०१७ च्या निवडणुकीचा. त्या वेळी भाजप व शिवसेना समसमान ताकदीचे होते. तरीही, राज्यात सत्तेत युती असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने महापौर पद शिवसेनेला दिले. ही बाब आजही भाजप नेत्यांच्या मनाला बोचत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. मुंबई महापालिकेतही युती करत शिंदे गटाने २९ जागा जिंकल्या आहेत.
भाजप (८९) आणि शिंदे सेना (२९) यांची बेरीज केली तर एकूण संख्याबळ ११८ होते, तर सभागृहात बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. तरीही, मुंबई महापालिकेच्या पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौर पद शिवसेनेकडे असावे, असा आग्रह एकनाथ शिंदे यांचा आहे.
मात्र, पहिल्यांदाच भाजपने ८९ जागांचा टप्पा गाठल्याने, “आता कोणाच्याही दबावाला बळी न पडता महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपद सोडू नका,” अशा थेट सूचना दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस व भाजप नेतृत्वाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपनेही यावेळी ताणून धरण्याचा निर्णय घेतला आहे.
आता भाजप जास्तीत जास्त उपमहापौर पद शिंदे गटाला देऊन समाधान करण्याची शक्यता आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तसेच, सुधार समिती, बेस्ट समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती आणि वृक्ष प्राधिकरण यांसारख्या महत्त्वाच्या समित्याही शिंदे सेनेला सहजासहजी सोडल्या जातील, असे सध्या तरी दिसत नाही. मात्र, या समित्यांमध्ये शिंदे सेना व अजित पवार गटाला सत्तेतील वाटा दिला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट बहुमत असतानाही तिथे युती व्हावी, असा आग्रह भाजपच्या स्थानिक नेत्यांचा आहे. मात्र, युती करताना ५०-५० टक्के सत्ता वाटप भाजपला हवे आहे.
भाजपने, “जर कल्याण-डोंबिवलीत आमचा महापौर असेल, तर ठाण्याबाबत विचार होऊ शकतो,” असे संकेत दिल्याने, शिंदे गट मुंबईत फार ताणून धरणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
यातच, येत्या २२ तारखेला आरक्षण सोडत होणार आहे. आतापर्यंत महापौर पदासाठी एससी व ओबीसी प्रवर्गातील महिला व पुरुष दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून आता केवळ एसटी प्रवर्ग शिल्लक आहे.
जर सोडतीत एसटी आरक्षण आले, तर भाजप, शिंदे सेना व अजित पवार गट – या तिन्ही पक्षांकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार नाहीत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे या प्रवर्गातील ३-४ नगरसेवक आहेत.
त्यामुळे, यंदा महापौर पद उद्धव ठाकरे गटाकडे जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास भाजपचा हेतूही साध्य होईल आणि शिंदे गटही दुखावला जाणार नाही, असा राजकीय अंदाज आहे.
तथापि, भाजपच्या नेत्यांचे छुपे नियोजन तयार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेची सत्तेची चावी आपल्या हातात असल्याचा भ्रम असेल, तर तो भ्रम लवकरच दूर होईल, असे भाजप वर्तुळात बोलले जाते.
महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजप नेतृत्वाला शिंदे वरचढ व्हावेत, असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे, जर शिंदे गटाने ऐनवेळी फार ताणून धरले, तर त्यांच्या पक्षाचे राजकीय नुकसान अटळ असल्याचे संकेत दिले जात आहेत.
मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल:
• भाजप – ८९
• उद्धव ठाकरे शिवसेना – ६५
• शिंदे शिवसेना – २९
• काँग्रेस – २४
• AIMIM – ८
• मनसे – ६
• अजित पवार राष्ट्रवादी – ३
• समाजवादी पार्टी – २
• शरद पवार राष्ट्रवादी – १

