मुंबई : होमिओपॅथी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एक वर्षाच्या आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे (CCMP) ॲलोपॅथी उपचार करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने विरोध केला असून या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सुमारे ८ हजार डॉक्टरांचे प्रमाणपत्र सध्या रोखण्यात आले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
डॉ. तुषार राठोड यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यांनी सांगितले की, एमबीबीएस अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा असून त्यामध्ये व्यापक क्लिनिकल आणि सर्जिकल प्रशिक्षण दिले जाते. मेडिसिन, सर्जरी, आयसीयू, आपत्कालीन सेवा, स्त्रीरोग, प्रसूती व बालरोग यांसारख्या गुंतागुंतीच्या उपचारांचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमात दिले जाते.
त्याउलट औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) हा केवळ एक वर्षाचा ‘ब्रिज कोर्स’ असून अशा मार्गाने आधुनिक वैद्यक उपचारांना परवानगी दिल्यास सर्वसामान्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, राज्यातील ३३ संस्थांमार्फत हा एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात आला. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी करण्यासाठी पोर्टल तयार करण्याचा अंतरिम आदेश न्यायालयाने दिला होता.
त्या आदेशानुसार आतापर्यंत २,१८२ डॉक्टरांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप अंतिम निर्णय दिलेला नसल्याने नोंदणी झाल्यानंतरही या डॉक्टरांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. न्यायालयाचा अंतिम आदेश आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, १३ ऑगस्ट २०१४ रोजीच्या निर्णयानुसार CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना काही मर्यादित स्वरूपात आधुनिक वैद्यकीय पद्धतीत उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही की ते आधुनिक वैद्यकीय पदवीधर डॉक्टरांची जागा घेऊ शकतात.

