मुंबई – राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई आणि तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, कागदपत्र तपासणी, समुपदेशन व मार्गदर्शन यामध्ये मदत करण्यासाठी संगणक सुविधांनी सुसज्ज अशी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरणे, तांत्रिक अडचणी सोडवणे आणि शंका निरसन करण्यासाठी सहाय्य केले जाईल.
या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला अधिक गती व सुस्पष्टता मिळेल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला