मुंबई – ग्रामीण भागात वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केली. सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ व ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून घोषित करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत बावनकुळे यांनी सर्पमित्रांच्या कार्याची आणि त्यांच्या अडचणींची माहिती घेतली. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, “गावकऱ्यांना सापांपासून वाचवण्यासाठी सर्पमित्र जीव धोक्यात घालून सेवा देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अधिकृत ओळखपत्र देण्याबरोबरच १० लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सविस्तर कार्यपद्धती तयार केली जाईल.”
सर्पमित्रांच्या कार्याला मान्यता मिळावी आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या सेवा अधिक प्रभावीपणे वापरता याव्यात यासाठी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेशी जोडण्याचा विचारही सुरू आहे.
बैठकीस वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व सर्पमित्रांची माहिती एकत्र करून त्यासाठी विशेष पोर्टल तयार करण्यात येणार असून ही माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल. त्यामुळे गरज पडल्यास नागरिक सर्पमित्रांशी थेट संपर्क साधू शकतील आणि या कार्यात पारदर्शकता येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला नवा सन्मान मिळेल आणि वन्यजीव संरक्षणातील त्यांचा सहभाग अधिक प्रभावी होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.