मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भर पत्रकार परिषदेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ले, तोडफोड झाली. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले होर्डिंग्ज छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फाडून टाकले.
मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. प्रत्येकावर संशयाने नजर ठेवली जात असून, “का आलात?” याचे कारण विचारले जात आहे.
सुरज चव्हाण प्रकरणामुळे छावा संघटनेचा रोष उफाळून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण पसरले आहे.