मुंबई : राज्यातील गरिब, कष्टकरी महिलांच्या आरोग्य, पोषण आणि हक्कांच्या प्रश्नांवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आज विधानपरिषदेत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. ससून डॉकच्या धर्तीवर कुलाब्यातही महिलांसाठी आरोग्य सुविधा व्हाव्यात, अंगणवाडीतील खिचडी प्रीमिक्स ऐवजी शिधा पद्धतीने कडधान्य मिळावं, तसेच वस्तीतील शौचालयांच्या वीज व पाणी बिलांमध्ये सवलत मिळावी, अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या.
कुलाब्यात मोठ्या प्रमाणात कोळंबी सोलण्याचे काम होते. या ठिकाणी शालेय वयातील मुली मोठ्या प्रमाणात सकाळपासून काम करत असल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. शाळा सोडून केवळ काम व घराची जबाबदारी यांमध्ये या मुली अडकतात. त्यामुळे कुलाब्यात सुद्धा महिलांसाठी आणि विशेषतः मुलींसाठी ससून डॉकसारख्या आरोग्य व पुनर्वसन सुविधांची आवश्यकता आहे, असा मुद्दा वाघ यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
त्याचवेळी मुंबईतील वस्ती शौचालयांबाबतही प्रश्न मांडत वाघ यांनी विचारले की, बीएमसी वस्ती शौचालयांच्या वीज व पाणी बिलांमध्ये सवलत देणार का? तसेच संपूर्ण राज्यात QR कोड तक्रार निवारण प्रणाली शौचालयांसाठी लागू करणार का, असा प्रश्न त्यांनी केला.
राज्यातील गरोदर आणि स्तनदा मातांच्या पोषणाबाबतही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. सध्या अंगणवाडी केंद्रांमार्फत Take Home Ration (THR) स्वरूपात मुगडाळ/तूरडाळ खिचडी प्रीमिक्स दिले जाते. परंतु, या प्रीमिक्समध्ये आधीच तेल, तिखट, मीठ मिसळले असल्यामुळे अनेक वेळा त्याला कुबट वास येतो व महिलांनी ते खाण्याचे टाळले जाते. त्यामुळे पोषणाचा मूळ हेतूच फसतो. पूर्वीप्रमाणे शिधा पद्धतीने डाळी-कडधान्य दिल्यास समस्या दूर होईल, अशी सूचना त्यांनी केली.
या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करत आमदार चित्रा वाघ यांनी सरकारच्या धोरणांवर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.