मुंबई – ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.
राज्य सरकारने ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली असून, यामध्ये दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन उद्दिष्टांवर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी १६ क्षेत्रनिहाय गट स्थापन करण्यात आले आहेत.
१८ जून ते १७ जुलै २०२५ दरम्यान नागरिकांचे मत, अपेक्षा आणि प्राथमिकता जाणून घेण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या QR कोड किंवा लिंकवरून व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
विधानसभेतील सर्व सदस्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.