महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाढत्या वेश्याव्यवसायामुळे मराठवाड्यात चिंता

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड व धाराशिव जिल्ह्यात वेश्याव्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये अलीकडेच पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून हे वेश्याव्यवसायाचे अड्डे उध्वस्त केले. एवढेच नव्हे तर नांदेडमध्ये स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या तीन मजली इमारतीतून भलतेच प्रकरण समोर आले.

विविध ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी पोलिसांनी छापे मारून हा प्रकार उघडकीस आणला असला, तरी या ठिकाणी असलेल्या परराज्यातील मुली केवळ देहविक्रीसाठीच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी या व्यवसायात नाईलाजाने आल्याचे समोर आले आहे. अशा महिलांसाठी सरकारने पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः परित्यक्ता, विधवा व कौटुंबिक छळामुळे न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या महिलांचा या व्यवसायात प्रवेश होत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज पोलीस स्थानक हद्दीत असलेल्या बजाजनगर मधील एका लॉजमध्ये वेश्याव्यवसायाचे रॅकेट कार्यरत होते. वाळूज पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाड मारली असता तीन महिलांसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचेही उघडकीस आले. या कारवाईत वाळूज पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल व मुद्देमाल जप्त केला.

सहा ऑगस्ट रोजी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बजाजनगरमधील जे.के.एल. लॉजच्या पहिल्या मजल्यावर महिलांना डांबून ठेवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे कळताच त्या ठिकाणी महिला अंमलदार, पंच आणि बनावट ग्राहकासह पोलिसांच्या पथकाने छापा मारला. त्या ठिकाणी काउंटरवर आसाम राज्यातील उडलगुरी येथील लीला शर्मा नावाच्या महिलेला अटक करून तिच्याकडून चालत असलेला कुंटणखाना उद्ध्वस्त केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरू असल्याने त्या ठिकाणी अशा धाडी पोलिसांकडून नेहमीच टाकल्या जात आहेत.

नांदेडमध्ये शिंदे सेना गटाच्या एका जिल्हा पदाधिकाऱ्याचाच ‘रेड ओके स्पा’ या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून आसाम व नागपूर येथील मुलींकडून सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. नांदेडमधील कॅनॉल रोडवर एका तीन मजली इमारतीत चालणारा हा स्पा सेंटर वेगळ्याच कारणाने चर्चेत आला. नांदेडमधील भाग्यनगर पोलिसांना या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड मारली असता चार मुली आणि तीन ग्राहक त्या ठिकाणी विचित्र अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी स्पा सेंटरचा मालक आणि तीन ग्राहकांना अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडीवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमोदसिंग साबळे, पंकज मनोज जांगिड, नाकसेन, अनिल गायकवाड, संतोष सूर्यकांत इंगळे आणि रोहन मिलिंद गायकवाड (सर्व राहणार नांदेड) यांच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या स्पा सेंटरमधून चार पीडित मुलींची सुटका करून त्यांना राज्य महिला गृहामध्ये पाठविण्यात आले. या स्पा सेंटरचा चालक हा राजकीय पक्षाचा प्रमुख पुढारी आहे. नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच आमदार व माजी खासदारांचा तो अतिशय जवळचा मानला जातो. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यातील सोशल मीडियावर त्या स्पा सेंटर चालकाचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाले. अशा अनैतिक व्यवसायांना कुठे ना कुठे राजकीय पाठबळ असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव महादेव परिसरात हॉटेल स्वराज्य फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज आहे. या ठिकाणी आशिष भाऊसाहेब शिंदे नावाच्या शिक्षकाचा मृतदेह आढळून आला. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात खाजगी संस्थेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाचा मृतदेह लॉजमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. तो शिक्षक लॉजवर कशासाठी होता हा प्रश्न अनुत्तरीत आहे. तसेच अत्यवस्थ अवस्थेत तो रूममध्ये आढळून आल्याने पोलिसांना त्याबाबत नंतर खबर देण्यात आली. हा प्रकार संशयास्पद असून याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांकडून त्याबाबत माहिती देण्यात आली नाही.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात सारोळ पाटीजवळ एका कला केंद्रावर कुंटणखाना सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. यातील एक पीडित महिला गुजरातमधील आहे. दरम्यान या प्रकरणी दोन पुरुष व एका महिलेविरुद्ध केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केज तालुक्यात रेणुका कला केंद्रात देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता मीना संतोष खराडे (राहणार बीड) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेली रक्कम देखील पोलिसांच्या पथकाने जप्त केली. या ठिकाणी गुजरात व इतर जिल्ह्यातून पीडित महिलांना आणून जबरदस्तीने देहविक्री व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले. या प्रकरणात शेख शफीक शेख हमीद (राहणार परभणी), जागा मालक रामनाथ ढाकणे तसेच मीना खराडे या तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातील येडशी जवळील वडगाव येथील गौरी लोकनाट्य कला केंद्रासमोर वाद झाला. चोराखळी येथील महाकाली कला केंद्रासमोर झालेल्या मारहाणीत गोळीबाराची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असताना गोळीबाराचे प्रकरण दाबले गेले असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान येडशी जवळील वडगाव येथील गौरी लोकनाट्य कला केंद्रासमोर वादाच्या प्रकरणात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी बालाजी भराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीलाल सायबा पवार, सुनील सायबा पवार, रमेश सायबा पवार यांनी शिवीगाळ करून मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली तसेच वाहनाचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. धाराशिव जिल्ह्यातही कला केंद्राच्या नावाखाली सर्रासपणे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

एकंदरीत मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत देहविक्री व्यवसायाने कळस गाठला आहे. मराठवाड्यात देहविक्रीच्या व्यवसायात परराज्यातील महिला व मुली मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. आसाम, गुजरात तसेच पश्चिम बंगाल येथील महिला व मुली या व्यवसायात आणल्या जात आहेत.

या व्यवसायात असलेल्या महिला व मुलींची अधिक माहिती घेतली असता, त्या स्वखुशीने या व्यवसायात आलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. काहींची न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, तर काही विधवा व परित्यक्ता आहेत. कोणतीही महिला स्वखुशीने स्वतःचे शरीर विक्रीसाठी तयार होत नसते; तिच्यावर तशी वेळ आलेली असते किंवा तशी वेळ आणलेली असते. त्यामुळे महिला व मुली अशा व्यवसायात ढकलल्या जात आहेत.

कौटुंबिक न्यायालयात महिलांच्या विषयी अनेक केसेस प्रलंबित आहेत. पतीकडून मिळणारी पोटगी ही तुटपुंजी व वेळेवर मिळत नसल्याने अनेक महिला नाईलाजाने उदरनिर्वाहासाठी अशा व्यवसायात जात असल्याचे दिसून आले. कमी वयात विधवा झालेल्या महिलांना कुठेही आसरा मिळत नाही. अशा महिला इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसायात उतरत आहेत. अनेक परित्यक्ता पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करीत आहेत.

आंबट शौकीन पुरुष मात्र अशा महिलांना शे हजार रुपये देऊन आपली भूक भागवून घेत आहेत. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असला, तरी या प्रकरणात येत असलेल्या महिलांना यापासून रोखण्याचे एक मोठे आव्हान समाजासमोर आहे, हे नक्की.

(लेखक डॉ. अभयकुमार दांडगे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्याशी 9422172552 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)

Dr Abhaykumar Dandage

Dr Abhaykumar Dandage

About Author

डॉ अभयकुमार दांडगे (Dr Abhaykumar Dandage) हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार असून मराठवाडा हा त्यांचा लेखनाचा विषय आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात