मुंबई : एलपीजी गॅसच्या दरवाढी आणि कथित गॅस तुटवड्याच्या विरोधात अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेर ‘आकाश स्वीट्स’ समोर हे धरना आंदोलन होणार आहे.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की एलपीजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढला असून काही भागांमध्ये गॅस पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादित झाल्यामुळे लहान हॉटेल आणि खाद्य व्यवसायांनाही फटका बसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढ मागे घ्यावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती उत्तर-पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा भावना शर्मा जैन यांनी दिली.
या आंदोलनात काँग्रेसचे विविध सेल, कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

