पुणे: भाकड जनावरे गोरक्षकांना दत्तक देण्यासाठी राज्य सरकारने ‘भाकड जनावरे दत्तक योजना’ जाहीर करावी, तसेच या जनावरांचा योग्य सांभाळ होत आहे की नाही, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी गोसेवा आयोगाचे महाराष्ट्र अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्याकडे केली. या संदर्भातील पत्र त्यांनी ई-मेलद्वारे पाठवले आहे.
माने यांनी पत्रात नमूद केले आहे की, गायीला महाराष्ट्र शासनाने ‘मातेचा’ दर्जा दिला असला तरी अनेक शेतकरी व गोरक्षकांच्या भीतीच्या सावटाखाली गायी व गुरांचे मालक त्यांना बेवारसपणे रस्त्यावर सोडून देतात. राज्यासाठी ही नामुष्कीची बाब असून, रस्त्यावर फिरणारी अशी भटक्या जनावरे वाहतुकीला अडथळा निर्माण करतात, अपघात घडवून आणतात आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरतात.
यावर उपाय म्हणून राज्यातील सर्व गोरक्षकांची यादी तयार करून त्यांना ही जनावरे दत्तक देण्यात यावीत. तसेच, जनावरांचा योग्य प्रकारे सांभाळ होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी एक समिती स्थापन करून ती प्रतिमहिना आढावा घेईल आणि लोकांसमोर अहवाल सादर करेल, अशी मागणीही माने यांनी केली आहे