मुंबई – राज्यातील वनजमीनींवर अनधिकृतपणे उभारलेली धार्मिक स्थळे आणि इतर अतिक्रमणांची सखोल चौकशी करून येत्या दोन महिन्यांत संबंधित अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत केली.
भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ अन्वये या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
यावर उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले, “वनजमिनींवर अतिक्रमण करून धार्मिक स्थळे उभारणाऱ्या संस्था तसेच त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये सहकार्य करणारे किंवा निष्काळजीपणा करणारे अधिकारी सुद्धा कारवाईपासून सुटणार नाहीत. त्यांच्यावरही चौकशी करून आवश्यक ती कठोर पावले उचलली जातील.”
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोंदेगाव येथील वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक ६३ आणि ६४ या जमिनींवर धार्मिक आणि शैक्षणिक संस्थेचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून परप्रांतीय लहान मुलांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा धक्कादायक आरोप आमदार दटके यांनी यावेळी केला.
यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडेही दटके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.