मुंबई
दूध उत्पादकांना दूधदराबद्दल दिलासा देण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयाचे अनुदान दिले जाईल अशा प्रकारची घोषणा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहामध्ये केलेली होती. 1 जानेवारीपासून दूध संकलनाचे नवीन मस्टर सुरू होते. या मस्टरमध्ये तरी दूध उत्पादकांना अशाप्रकारे अनुदान मिळेल अशी अपेक्षा दूध उत्पादक शेतकरी बाळगून होते.
मात्र 1 जानेवारी उलटून गेली आणि नवीन मस्टर सुरू झाले तरीसुद्धा अद्याप अशा प्रकारचं अनुदान शेतकऱ्यांना देण्याबद्दल हालचाल झालेली नाही. यावरुन किसान सभेकडून रोष व्यक्त केला जात आहे. दुग्धविकास मंत्र्यांनी शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदानाची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात हाती काहीच आलं नसल्याचा आरोप किसान सभेकडून केला जात आहे.
अनुदानाची फाईल अर्थ विभागाकडेच पडून असून याबाबत अर्थ विभागाचा व मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्याशिवाय शासनआदेश सुद्धा काढला जाणार नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली आहे.
किसान सभेच्या डॉ अजित नवलेंची मागणी –
शेतकरी अडचणीत असताना अनुदान द्यायचे नाही व मार्च दरम्यान लीन सीजन सुरू झाल्यानंतर जेव्हा आपोआप दुधाचे दर वाढतात तेव्हा अनुदान देण्याबाबत भूमिका घ्यायची हा सरकारचा वेळकाढूपणा शेतकरी विरोधी आणि दुध व्यवसायाला अत्यंत मारक आहे. सरकारने अधिक अंत न पाहता उद्या किंवा परवा होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत अंतिम निर्णय करावा. सहकारी दूध संघांबरोबरच खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रतिलिटर पाच रुपयाचे अनुदान देण्याबाबतचा निर्णय घ्यावा व शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रति लिटर 34 रुपयाचा दर देणे खाजगी व सहकारी दूध संघांना बंधनकारक करावं तसच पशुखाद्याचे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशा प्रकारची मागणी किसान सभा पुन्हा एकदा करत आहे. सरकारने याबाबत उद्याच्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्रभर आंदोलन उभे करण्याचा निर्णय किसान सभा जाहीर करत आहे.