महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वीर रेल्वे स्टेशनजवळ मध्यरात्री 12.30 च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये – सूर्यकांत सखाराम मोरे (नवेनगर, महाड), साहिल नथुराम शेलार (कुंभारआळी, महाड), प्रसाद रघुनाथ नातेकर (कुंभारआळी, महाड) यांचा समावेश असून समीर सुधीर मुंडे यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
गंभीर जखमींमध्ये सुरज अशोक नलावडे (चांभारखिंड, महाड), शुभम राजेंद्र मातळ यांचा समावेश असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी सुरज नलावडेला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे.
अपघात कसा घडला?
महाडहून लोणेरेकडे स्कॉर्पिओ (MH 06 BE 4041) ने जात असताना रात्री 12.30 च्या सुमारास गाडीचे इंधन संपल्यामुळे वीर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर गाडी उभी होती. याच वेळी चिपळूणहून पनवेलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टोविंग व्हॅन (MH 14 CM 309) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी पुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून 100 फूट खाली शेतात फेकली गेली.
अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टोविंग व्हॅनचा चालक ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.
महाडमध्ये शोककळा
महाड शहरातील चार तरुणांचा या अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण महाडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. राष्ट्रीय महामार्ग पोलीस आणि परिवहन विभागाने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.