मुंबई – अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सात नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केली जाणार असून त्यापैकी एक पोलीस ठाणे मंजूर झाले आहे, तर उर्वरित सहा पोलीस ठाण्यांसाठी मंजुरी प्रक्रियेत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विक्रम पाचपुते यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ नुसार यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. अहिल्यानगर हा विस्तीर्ण जिल्हा असून, येथे गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या आणि पोलीस कर्मचारी वाढवण्याची गरज असल्याचे पाचपुते यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ५५० नवीन पोलीस पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल.”
मुख्यमंत्रींच्या या घोषणेमुळे अहिल्यानगरच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.