मुंबई: कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी ५१९.६ मीटरवरून ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्र लिहून अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, अशी स्पष्ट विनंती केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पत्रात यामुळे होणाऱ्या बॅक वॉटर प्रभावामुळे पूरधोका, नदीपात्रात गाळ साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि बंधाऱ्यांमध्ये गाळाची भर पडणे यांसारख्या गंभीर बाबींवर सविस्तर प्रकाश टाकला आहे.
अहवालाअगोदर निर्णय घेणे अयोग्य – मुख्यमंत्री
अलमट्टी धरणामुळे संभाव्य पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी’ यांच्याकडे सिम्युलेशन व हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम सोपवले आहे. संबंधित अहवाल मिळण्याआधी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णयाचा पुनर्विचार करावा – मुख्यमंत्री फडणवीस यांचा आग्रह
कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळे दरवर्षी कृष्णा नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, नागरिकांचे प्राण, मालमत्ता आणि शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे दोन्ही राज्यांतील नदीकाठच्या नागरिकांच्या हितासाठी कर्नाटक शासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.