नवी मुंबई: प्रत्येक क्षेत्रात चांगले कार्य करणारे अनेक घटक समाजात कार्यरत असतात; मात्र त्यांना सन्मानाचे व्यासपीठ नेहमीच मिळते असे नाही. अशा उपेक्षित घटकांना प्रकाशझोतात आणण्याचे काम ‘धगधगती मुंबई’ या साप्ताहिकाच्या माध्यमातून गेली सोळा वर्षे सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
साप्ताहिक धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोपरखैरणे, नवी मुंबई येथील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी अभिनेते विजय पाटकर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई महापौर सौ. सुजाता पाटील, ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, अँड. स्मिता चिपळूणकर, उद्योजक हनुमंत रांजणे, के. के. शेलार, लोककलावंत योगेश चिकटगावकर, संपादक भिमराव धुळप, सरपंच रमेश धनावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील घोगाव (ता. कराड) येथील भिमराव धुळप यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली १६ वर्षे समाजातील उपेक्षित घटकांच्या कार्याला व्यासपीठ दिले आहे. त्यांच्या चिरंजीव ओमकार धुळप यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारितेची सक्षम टीम उभी करण्यात आली आहे. समाजासाठी कार्य करणाऱ्या सामान्य व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देणे ही सामाजिक जबाबदारी वाढवणारी बाब असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच रमेश कदम (समाज रत्न), वसंत जाधव (समाज गौरव), राजन किणे (दलित मित्र), रमेश धनावडे (आदर्श सरपंच), प्रताप महाडिक (शिक्षण रत्न), संगम प्रतिष्ठान व नरेंद्र छाया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट (उत्कृष्ट संस्था), नंदकुमार काटकर (सहकार रत्न), डॉ. शांताराम कारंडे (साहित्यरत्न), सचिन वरखडे (वैद्यरत्न), अँड. मनीषा चव्हाण (कायदा रत्न), डॉ. सुरज पाटील (वैद्यकीय रत्न), विद्यावाचस्पती विजयकुमार स्वामी (अध्यात्मिक), अनुजा दांडगे (उद्योजिका), के. के. शेलार (उद्योग रत्न), हनुमंत रांजणे (समाजभूषण) आदी मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार राहुल शेवाळे आणि नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. सातारा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वाशी तसेच कराड परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. युवा पत्रकार ओमकार धुळप व धगधगती मुंबईच्या टीमने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
विशेष सन्मान
‘नवरात्री प्रेरणा विशेष सन्मान’ पुरस्कार आ. ज्योती गायकवाड, अँड. स्मिता चिपळूणकर, रेणुका सोनवणे, स्वाती माने होलमुखे, मानसी पोळ, दिव्या ढोले, राधिका महांकाळ, भारती प्रकाश पाटील आणि प्रिया शिंदे यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, पैठणी व पुष्पगुच्छ देऊन महिलांचा गौरव करण्यात आला.

