मुंबई : एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकात करण्यात आलेल्या बदलांवरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुघल शासकांचे एकतर्फी, नकारात्मक चित्रण करून भाजप आणि संघाच्या विचारसरणीला पूरक अशी विषारी मानसिकता विद्यार्थ्यांच्या मनात तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“विद्यार्थ्यांनी इतिहास समतोल दृष्टिकोनातून न पाहता हिंदू आणि मुस्लिम शासक असा भेदभाव करावा, हिंदू राजा म्हणजे सज्जन आणि मुस्लिम शासक म्हणजे क्रूर असे समजावे, अशी भाजप आणि संघाची भूमिका आहे,” असे सावंत म्हणाले. “ही शिक्षणव्यवस्था बौद्धिक क्षमतेची वाढ करण्यासाठी नाही, तर भविष्यातील भाजप मतदार घडवण्यासाठी आहे. संविधान मानणारे नागरिक नकोत, तर द्वेषाने भरलेला समाज तयार करायचा आहे.”
सावंत यांनी असा इशारा दिला की भाजपला केवळ द्वेष, राग आणि असहिष्णुतेच्या वातावरणातच सत्ता मिळवता येते. “त्यामुळेच ही फाळणीवादी मानसिकता लहान वयातच पेरली जात आहे. हा इतिहासाचा अभ्यास नसून, भविष्यातील समाजाला विषारी बनवण्याचा कट आहे,” असा आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श उदाहरण देणे योग्य असले तरी, त्याचबरोबर पेशवाईत वाढलेला जातीयवाद, शोषण, अत्याचार, अनैतिकता यावर का बोलले जात नाही, असा सवाल सावंत यांनी केला. “शिवाजी महाराजांच्या सद्गुणांना सावरकरांनी ‘सद्गुण विकृती’ म्हटले होते, ते का सांगितले जात नाही?”
“भाजप सरकारने ११ वर्षे शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर का शासन केले नाही? मग संघाच्या द्वेषमूलक विचारांवर का चालत आहे?” असा थेट सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
एनसीईआरटीच्या पुस्तकात करण्यात आलेल्या या बदलांमुळे पुन्हा एकदा शैक्षणिक अभ्यासक्रमात राजकीय हस्तक्षेप, इतिहासाचे विकृतीकरण आणि तरुण पिढीला सांस्कृतिक फाळणीच्या दिशेने ढकलण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.