मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापन दिनाचा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळ्याचा भव्य कार्यक्रम मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या सोहळ्याला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी अनुसूचित जातीतील युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर शैक्षणिक व व्यावसायिक संधी मिळवाव्यात आणि आरक्षणाचा लाभ अधिक गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहावा, असे आवाहन केले. तसेच सोसायटीने स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव पुढे आणावा, असेही त्यांनी सुचवले
कार्यक्रमात बोलताना राज्यपाल राधाकृष्णन यांनी अनुसूचित जातीतील युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर शिक्षण व नोकरीच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि आरक्षणाचा लाभ अधिक गरजू विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवावा, असे आवाहन केले. आरक्षण ही विकासाची किल्ली असून, विद्यार्थ्यांनी जागतिक स्पर्धेसाठी सज्ज राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्यपालांनी सांगितले की, डॉ. आंबेडकरांनी निर्माण केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी आज लाखो विद्यार्थ्यांचे जीवन घडवते आहे. अनेक विद्यार्थी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात आपल्या गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवत आहेत, ही बाब अत्यंत प्रेरणादायक आहे. सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास यावा आणि आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सर्वसमावेशक विकास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आला. यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरियातील धम्मदीप भंते, एड. सुरेंद्र तावडे, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर आणि बळीराम गायकवाड यांचा समावेश होता.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात पीपल्स एज्युकेशन सोसायटीने आता स्वायत्त विद्यापीठाचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली. त्यामुळे संस्था नव्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करून शैक्षणिक क्षेत्रात आणखी प्रगती करू शकेल, असे ते म्हणाले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा गौरव व्यक्त केला. त्यांनी यापूर्वी संस्थेच्या परिसर विकासासाठी निधी मंजूर केल्याची माहिती दिली. याशिवाय राज्यभरात सामाजिक न्याय विभागातर्फे १२० तीन-तारांकित वसतिगृहे उभारण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि संस्थेचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करून सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायक स्वरूपात पार पडले. संस्थेचा वर्धापन दिन सामाजिक समतेच्या मूल्यांना समर्पित होता, हे या सोहळ्याने पुन्हा सिद्ध केले.