मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ‘समग्र’ संस्थेमध्ये आज ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा गतीमान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “डिजिटल गव्हर्नन्स ही आता केवळ सोयीची गोष्ट राहिली नसून काळाची गरज बनली आहे. सर्व शासकीय योजना आणि सेवा ऑनलाईन प्रणालीद्वारे नागरिकांपर्यंत सहज पोहोचणार आहेत.”
‘नो ऑफिस डे’ सारख्या उपक्रमांमुळे नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता राहणार नाही. भविष्यात शासकीय सेवा व्हॉट्सॲपसारख्या सुलभ प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील. यासाठी प्रत्येक विभागाने आपली उद्दिष्टे, कालमर्यादा आणि अंमलबजावणीची स्पष्ट रूपरेषा ठरवावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
नागरिकांचा सक्रीय सहभाग आणि शासन-नागरिक यांच्यातील समन्वयामुळे सेवा प्रभावीपणे पोहोचतील आणि शासनाचे सकारात्मक ब्रँडिंगही घडेल. या करारामुळे शासकीय व्यवस्थेत मूलभूत व दीर्घकालीन परिवर्तन घडणार आहे.
या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, समग्रचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.