ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मत चोरीचे आरोप संपूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट करत, “शंका असल्यास निवडणूक आयोगाकडे प्रतिद्यापत्र सादर करावे, पत्रकार परिषद घेऊन नुसते आरोप करणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
राहुल गांधी यांनी मतदारांची नावे वगळून मतदारसंख्या कमी केल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, “मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी ठरावीक प्रक्रिया असते, ती एका दिवसात किंवा अचानक होऊ शकत नाही.”
शिंदे म्हणाले, “आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब टाकणार होते, पण ते करायला विसरले.” राहुल गांधी यांनी कर्नाटकातील आलांड मतदारसंघातील ६,०१८ मतदार कमी झाल्याचा आरोप केला होता. मात्र २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचेच भोजराज पाटील विजयी झाले होते, याची आठवण शिंदे यांनी करून दिली.
राहुल गांधी पराभव झाल्यावर कायम ईव्हीएम, मतदार यादी आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, असे शिंदे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्याची सुरुवात काँग्रेसच्या काळात, यूपीए-२ च्या कार्यकाळातच झाली. त्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आज ज्या प्रक्रियेतून देशभर निवडणुका घेतल्या जातात, त्याच प्रक्रियेतून कर्नाटक, तेलंगणा, पंजाबमध्येही काँग्रेसचे सरकार निवडून आले. मग तिथे प्रक्रिया योग्य आणि इथेच चुकीची कशी?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील निवडणुका पारदर्शकरित्या झाल्या असून गेल्या तीन वर्षांत महायुती सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर मतदारांनी भरभरून पाठिंबा दिला, असे शिंदे म्हणाले. “जनतेने दिलेल्या या कौलावर आक्षेप घेणे म्हणजे जनमताचा अनादर आहे,” असे ते ठामपणे म्हणाले.