ठाणे : “जो पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतो तोच पुढे जातो. आमच्या पक्षात वशिलेबाजीला स्थान नाही. पक्ष वाढला की तुमचा मान-सन्मान आपोआप वाढतो. त्यामुळे झोकून देऊन काम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कार्यकर्त्यांना केले.
ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे, पीटर डिसोजा, विलास पाटील, अभिषेक कुसाळकर, सुनील कुराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे झालेल्या या कार्यक्रमात हाती भगवा घेत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. “मी मुख्यमंत्री होतो, आज उपमुख्यमंत्री आहे. सत्ता आणि अधिकार हातात आहेत, तरीही कधीही दुरुपयोग केलेला नाही. आज पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते पूर्वी शिवसेनेच्या विरोधात काम करत होते, तरीही मी कधीही त्यांच्यावर राग धरला नाही. राजकारणाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी असावी लागते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्यासह ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.