मुंबई : महाराष्ट्रातील समृद्ध प्रयोगात्मक कलांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करता यावे, यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राला पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत केली.
या बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, लोककला अभ्यासक प्रा. प्रकाश खांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शेलार म्हणाले, “महाराष्ट्राला शाहीर, पोवाडा, जागरण, गोंधळ, तमाशा, वाघनाट्य, दशावतार, भारुड, कीर्तन, लोकनाट्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या कलांमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचे ऐतिहासिक संदर्भ दडलेले आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी संशोधनाची गरज असून, हे संशोधन जगासमोर मांडले गेले पाहिजे.”
राज्यातील आणि राज्याबाहेरील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासकांसाठी हे संशोधन केंद्र उपयुक्त ठरणार असून, त्या दृष्टीने या केंद्राचा प्रारूप आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री शेलार यांनी पुढे सांगितले, “या संशोधन केंद्राला योग्य नाव देताना, कलाक्षेत्रातील जाणकारांनी सुचविल्यानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी असलेल्या आणि लोककलांच्या जतन, प्रचार व प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या शाहीर साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.”