मुंबई : मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी नियम २९३ च्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना केला.
मुंबई शहरावर कोणा एकाची मालकी नाही. या शहराच्या विकासात सर्व जाती धर्मियांचे योगदान आहे. १९३१ पासून मुंबईच्या महापौरांची नावे पाहिली तर जे. बी. बोमन, एच. एम. रहिमतुल्ला, वाय. जे. मेहरअली, एस. पी. सबावाला, ई. ए. बंदुकवाला. ए. यु. मेमन. स. का. पाटील अशी दिसतात. मुंबईचा रंग बदलण्याचा आरोप चुकीचा आहे, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.
भिवंडी शहराच्या वाहतुक कोंडीचा प्रश्न यावेळी शेख यांनी उपस्थित केला. राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करायला सरकार निघाले आहे. भिवंडीला ‘लॉजिस्टीक हब’ करणार आहे. पण, इथली वाहतुक समस्या केव्हा सोडवणार. भिवंडीच्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही, परिणामी अनधिकृत बांधकांम होत असून धोकादायक इमारतींचे प्रमाण वाढले असल्याचे शेख म्हणाले.
भाजप आमदार अमीत साटम यांनी या प्रस्तावामध्ये मुंबईचा रंग बदलण्याचे षडयंत्र असून उद्या कोणी खान मुंबईचा महापौर होईल, असे वक्तव्य केले होते. त्याला आमदार रईस शेख यांनी आज प्रत्युत्तर दिले.