वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसखोरी; महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय
नांदेड: राजस्थानमधील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत घुसखोरी केल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या बनावट रहिवासी प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांनी एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले असून, आता महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील खऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याची तीव्र भावना व्यक्त होत असून, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
संपूर्ण देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देताना १५ टक्के ऑल इंडिया कोटा राखीव असतो, तर उर्वरित ८५ टक्के जागा संबंधित राज्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असतात. सध्या तिसऱ्या फेरीची (Round 3) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याच प्रक्रियेत राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि केरळ या राज्यांतील शेकडो विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात प्रवेश मिळवण्यासाठी खोटे रहिवासी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे.
या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी पूर्वी त्यांच्या मूळ राज्यात विविध प्रवर्गातून प्रवेश मिळवलेला असून, महाराष्ट्रात मात्र नवीन ओबीसी किंवा इतर आरक्षण प्रवर्गांचा आधार घेतल्याचे उघड झाले आहे. उदाहरणार्थ, राजस्थानमधील काही विद्यार्थी त्यांच्या राज्यात अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून पात्र ठरले होते, पण महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गातून पात्र ठरल्याचे दिसते.
या प्रकारामुळे महाराष्ट्रातील पात्र आणि मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, भविष्यात अशा फसवणुकीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात घुसणारे विद्यार्थी “गुन्हेगारी प्रवृत्तीचे डॉक्टर” बनण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.
त्यांनी अशा विद्यार्थ्यांची तात्काळ चौकशी करून, त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा विद्यार्थ्यांना किमान पाच ते सहा वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षणापासून निलंबित करण्याची मागणीही पुढे आली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पूर्वी अशाच प्रकारच्या फसवेगिरीच्या प्रकरणात आरोपी विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असल्याचे निदर्शनास आले आहे.