ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (कोमसाप) ठाणे शहर शाखेत सुमारे ५० हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोमसाप ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या विरोधात ठाण्यातील पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमसाप ठाणे शहर शाखेची नवीन कार्यकारिणी ३ जून २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे झालेल्या सभेत बिनविरोध निवडण्यात आली होती. या सभेत मनोज वैद्य यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा, जुन्या पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या बँक खात्यातून परस्परपणे पैसे काढल्याचा प्रकार घडला. २५ जुलै २०२३ रोजी, माजी सचिव राजेश दाभोळकर आणि माजी कोषाध्यक्षा साधना ठाकूर यांनी ठाणे भारत सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील खात्यातून ५० हजार रुपये रोख रक्कम काढून जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्या हवाली केली.
हे आर्थिक व्यवहार नवे अध्यक्ष मनोज वैद्य यांच्या पूर्णतः अज्ञानात झाले. त्यानंतर, अजून एक चेक घेतल्याचे व त्याद्वारे पुन्हा ५० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, माजी कोषाध्यक्षा साधना ठाकूर यांनी वेळेवर हा प्रकार लक्षात घेतल्याने तो थांबवण्यात आला.
या प्रकरणात जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणून पैसे काढले असल्याचा आरोप आहे. या रकमेचा आजतागायत कोणताही हिशोब ठाणे शहर शाखेला दिला गेलेला नाही.
शाखेच्या बँक खात्याचे लेखापरीक्षण रखडल्याने, नवीन पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचे अधिकार अद्याप प्रलंबित होते. याचा गैरफायदा घेत जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी पदाचा दुरुपयोग करत अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत शाखाध्यक्ष मनोज वैद्य यांनी केंद्रीय पदाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आता शाखेची कार्यकारिणीची मुदत संपत आली असल्याने, या प्रकरणाचा कायदेशीर मार्गाने निकाल लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
त्याअनुषंगाने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याप्रकरणी कोमसाप ठाणे शहर शाखेचे अध्यक्ष मनोज वैद्य यांनी मागणी केली आहे की, संस्थेच्या केंद्रीय अध्यक्षांनी जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांच्यावर तातडीने कारवाई करावी, त्यांना सर्व पदावरून हटवावे आणि संस्थास्तरावरही या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.