मुंबई – “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले जाते, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय आढावा बैठकीला फक्त संबंधित विभागाच्या मंत्र्यांनाच बोलावले जाते.” त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना काहीही आधार नाही, असे स्पष्ट स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले.
रायगड जिल्हा आढावा बैठकीवरून चर्चेला उधाण
रायगड जिल्ह्याच्या आढावा बैठकीला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे अनुपस्थित राहिल्याने, तसेच त्यांना बैठकीला आमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून वादंग निर्माण झाले होते. शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री भरतशेठ गोगावले देखील गैरहजर होते. त्यामुळे स्थानिक आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये झळकल्या.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर या प्रकरणाबाबत विचारणा केली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणताही आडपडदा न ठेवता स्पष्ट सांगितले – “या आढावा बैठकीस फक्त मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते, आमदारांना नव्हते.”
दिव्यांगांसाठी १% निधी राखीव – उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
• जिल्हा नियोजन समितीच्या ९५% निधीतून १९% निधी विविध प्रशासकीय विभागांसाठी राखीव ठेवला जातो.
• दिव्यांग कल्याणासाठी त्यातील १% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती राज्याच्या लोकसंख्येच्या २.६३% आहेत.
• २०२५-२६ पासून जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येक वर्षी हा १% निधी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येईल.
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध कायम
बैठकीत अलमट्टी धरणाच्या उंची वाढविण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. यावर अजित पवार यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की,
“आम्ही या प्रस्तावाला विरोध आहोत आणि त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.”
नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्राकडून निधी मागणार
• नाशिक येथे दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
• उत्तर प्रदेशला केंद्राने यापूर्वी मदत दिली होती, तसेच महाराष्ट्रालाही मागील कुंभमेळ्यात निधी मिळाला होता.
• यावेळीही हा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बैठकीस खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे हे दोघे उपस्थित होते.