मुंबई: राज्यात जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्यांची मुदत संपत आहे, अशा तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार २० फेब्रुवारी २०२६ पासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असून ७ एप्रिल २०२६ रोजी ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (प्रांत) आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम
तालुकास्तरावर तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील.
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून प्रस्तावाला मान्यता दिली जाईल, असे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
हरकती व सुनावणी
७ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग रचनेबाबत हरकती मागविण्यासाठी अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांना १३ एप्रिल २०२६ पर्यंत हरकती नोंदवता येतील. प्राप्त हरकतींवर २१ एप्रिल २०२६ पर्यंत उपविभागीय अधिकारी (प्रांत) सुनावणी घेणार आहेत.
यानंतर जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून २८ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करतील व ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाईल. ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत.
मे अखेरीस निवडणुकांची शक्यता
या वेळापत्रकानुसार मे महिन्याच्या अखेरीस ग्रामपंचायत निवडणुका पार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुका मे अखेरीस झाल्यास शिक्षकांची उन्हाळी सुट्टी रद्द करून निवडणूक कामासाठी नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.

