कोल्हापूर: गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूर चित्रनगरीत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, तसेच आधुनिक पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओच्या भूमिपूजनाचा सोहळा दि. २८ जून रोजी सकाळी ११:५० वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य मंत्री व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, तसेच जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
विकासकामांचा आढावा:
चित्रनगरीत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये चित्रीकरणासाठी रेल्वे स्टेशन सेट, नवीन वाडा, चाळ, मंदिर, अंतर्गत रस्ते, दोन वस्तीगृहे अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. या कामांचा थेट परिणाम स्थानिक रोजगारनिर्मितीवर आणि कलाकार व तंत्रज्ञ यांना मिळणाऱ्या संधींवर होणार आहे.
नवीन स्टुडिओसाठी भूमिपूजन:
तंत्रज्ञानाच्या सतत बदलत्या प्रवाहाला अनुसरून चित्रनगरीत सुसज्ज पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओची उभारणी केली जात असून, त्याचे भूमिपूजनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
विशेष निमंत्रित आणि नागरिकांसाठी खुली संधी:
या उद्घाटन सोहळ्यास चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित कलाकार व मान्यवरांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सद्यस्थितीत चित्रनगरीत तीन चित्रीकरणे सुरू असून, अनेक जाहिराती, मालिकांचे व चित्रपटांचे चित्रीकरण येथे नियमितपणे होत आहे.
दिवसभर जनतेसाठी चित्रनगरी खुली:
दि. २८ जून रोजी चित्रनगरी नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुली ठेवण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर चित्रनगरीतर्फे करण्यात आले आहे.
“चित्रसूर्य” संगीत कार्यक्रम:
ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, शाहू स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता “चित्रसूर्य” या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात कमलेश भडकमकर संगीत संयोजन करणार असून, निवेदनाची जबाबदारी श्रीरंग देशमुख आणि सीमा देशमुख यांच्याकडे आहे.
कार्तिकी गायकवाड, मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, माधुरी कुंभार, शेफाली कुलकर्णी आणि पियुषा कुलकर्णी हे ख्यातनाम कलाकार सूर्यकांत मांढरे यांच्या जीवन आणि चित्रपट प्रवासावर आधारित गीतांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत.
हा संपूर्ण कार्यक्रम अॅड. आशिष शेलार (सांस्कृतिक कार्यमंत्री) आणि विकास खारगे (अपर मुख्य सचिव, सांस्कृतिक कार्य तथा मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
**कोल्हापूर चित्रनगरीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि “चित्रसूर्य” कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.