मुंबई : मुंबई ते विजयदुर्ग या सागरी रो-रो सेवेचा थांबा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे देण्यात यावा, अशी मागणी राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई ते कोकण प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई–कोकण दरम्यान सागरी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला असून प्रवाशांना मोठी सोय होणार आहे.
योगेश कदम यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे सध्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. दापोली तालुक्यात रेल्वे मार्गाची सुविधा नसल्यामुळे येथील नागरिकांना मुंबईसह इतर भागात जाण्यासाठी प्रामुख्याने रस्ते किंवा सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते.
अशा परिस्थितीत मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेचा थांबा हर्णे बंदर येथे दिल्यास दापोली तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल. तसेच कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी सागरी मार्ग अधिक सोयीस्कर ठरेल आणि स्थानिक पातळीवर सागरी वाहतुकीलाही चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश देऊन मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेचा थांबा हर्णे बंदर येथे देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.

