मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर अत्यंत जोमाने पुढे जात असतानाच, यंदा पुनश्च नागपूरस्थित अरुण जोशी यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीद्वारे सावरकरभक्तांनी स्मारकाच्या कार्याला अधिक प्रभावी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. कुशल संघटन, प्रशासकीय क्षमता, नियोजनबद्ध कार्यपद्धती, सूक्ष्म निरीक्षण आणि कृतीशीलता ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ३ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
By रणजित विक्रम सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची कृतिशीलता सातत्याने अधोरेखित करणारे, संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले अरुण जोशी हे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांचे समर्पित आणि कृतार्थ जीवनप्रवास प्रत्येक राष्ट्रप्रेमींसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.
कॉलेज शिक्षणाच्या काळात, १९७२ पासून त्यांनी हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते आणि हिंदू संघटक विक्रमराव सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार सुरू केला. या कार्यासाठी संघटनात्मक उपक्रमांसोबतच निवडणुकांचे माध्यमही त्यांनी स्वीकारले. नागपूर महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकांमधून हिंदुमहासभेचे विचार पुढे नेण्याचे कार्य त्यांनी केले.
समान नागरी कायदा, श्रीराम जन्मभूमी निर्मिती, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे या विषयांवरून पुढे जनआंदोलने उभी राहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित शैक्षणिक संस्था सुरू करून त्यांनी सांस्कृतिक व बौद्धिक पातळीवरही हे विचार समाजात रुजवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत विक्रमराव सावरकर यांनी त्यांच्यावर नागपूर नगर हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. पुढे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देखील त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.
त्यांच्या कार्याची दखल घेत नुकतेच नागपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर समितीच्या वतीने त्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विदर्भासह राज्यभरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विक्रमराव सावरकर यांनी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली. या भूमिकेत त्यांनी प्रथमच स्मारकाचे कार्य देश-विदेशात पोहोचवले. सलग १२ वर्षे अध्यक्षपदी राहून त्यांनी स्मारकासाठी व्यापक व दीर्घकालीन स्वरूपाचे कार्य केले.
या कालावधीत अंदमान विमानतळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणे व तेथे पुतळा उभारणे, विविध राज्यांच्या अभिलेखागारांतून सावरकरांबाबतची ऐतिहासिक माहिती संकलित करणे, लंडनमधील शासकीय संग्रहालयातून दुर्मिळ चित्रफित मिळवणे, अंदमानात लिहिलेल्या उर्दू गझलांचा ठेवा शोधणे, स्वातंत्र्यवीरांचे निवडक साहित्य १२ प्रादेशिक भाषांमध्ये तसेच ब्रेल लिपीत उपलब्ध करून देणे, अंदमानातील कोठडीची प्रतिकृती उभारणे, सावरकरांचा इतिहास मांडणारा त्रिमिती दृकश्राव्य कार्यक्रम सादर करणे, स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाची निर्मिती, भगूर येथील जन्मस्थान असलेला वाडा दत्तक घेणे, लडाख येथे सावरकरांच्या नावाने गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेच्या निर्मितीस सुरुवात करणे, ‘हे मृत्युंजय’ या अंदमान पर्वावर आधारित नाटकाचे राज्य व देशभर प्रयोग आयोजित करणे—या सर्व उपक्रमांमुळे सावरकर विचारांचा व्यापक प्रसार झाला.
याच नाटकाचे प्रयोग जेएनयू, नवी दिल्ली तसेच नाशिक कारागृहातही झाले. हिमालय पर्वतरांगेतील हिमाचल प्रदेशात बातलजवळील हिमशिखराला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हिमशिखर’ असे नाव देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सावरकरांच्या उर्दू गझलांवर आधारित ‘हम ही हमारे वाली है’ ही संगीतमय ध्वनीफित तयार करण्यात आली असून, या ध्वनीफितीसाठी अमिताभ बच्चन यांनी निवेदन केले.
या सर्व कार्यामुळे प्रेरणा घेत नवनिर्वाचित मंत्रिमंडळासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकात येऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करून आपल्या कार्याची सुरुवात केली. बाबा रामदेवांपासून ते जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांसारख्या अनेक मान्यवरांचा स्मारकातील वावर वाढू लागला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर हिंदुत्ववादी विचार समजावून सांगणारे प्रभावी केंद्र बनत असल्याचे यातून स्पष्ट होते.
याशिवाय विदर्भातील प्रसारमाध्यम क्षेत्रातही अरुण जोशी अग्रणी भूमिका बजावत आहेत. लोकप्रिय हिंदी दैनिक ‘युगधर्म’चे ते प्रबंध संपादक असून, विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा ज्ञानयज्ञ अखंड प्रज्वलित ठेवला आहे. शिशुवर्गापासून ते महाविद्यालयांपर्यंतची अनेक शिक्षण संकुले नागपूर शहरात त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून, हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
प्रगत, सुनियंत्रित प्रशासन आणि नेतृत्वक्षमतेने परिपूर्ण असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून, शिस्त व कामाप्रती समर्पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना अधिक प्रगल्भ आणि सकारात्मक पद्धतीने सादर केल्यामुळेच ते अनेकांसाठी प्रेरणा आणि आशेचा स्रोत ठरले आहेत. राष्ट्रभक्तीच्या विचारांची सर्जनशील संस्कृती घडवण्याचे कार्य त्यांनी आपल्या आयुष्यातून साध्य केले आहे.
त्यांचा अमृतमहोत्सव येणाऱ्या काळात नव्या पिढीतील सावरकरप्रेमींना निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरेल.

