By: तुषार राजे
कल्याण: कार्ला येथील एकविरा देवी म्हटली की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव आपोआप पुढे येते. कोळी समाजाची आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाची कुलदेवता असलेल्या या शक्तिपीठाचा ठाकरे कुटुंबाशी संबंध योगायोगाने जुळला—आणि तो योग घडवून आणला धर्मवीर आनंद दिघे यांनी.
दिघेंमुळे जुळलेले ठाकरेंचे गडाशी नाते
८०च्या दशकात (बहुधा १९७६–७७) कार्ला–वेहरगाव परिसरातील परिस्थिती बिघडली होती. एकविरा देवस्थानातील अव्यवस्था, अंतर्गत वाद आणि कारभारातील ढिलेपणा यामुळे गडावरील काही प्रतिनिधी थेट आनंद दिघे यांना ठाण्यात भेटायला आले. मीही त्या भेटीत उपस्थित होतो.
त्या मंडळींनी संपूर्ण स्थिती सांगून “आपण एकविरा मंदिराचा कारभार सांभाळा” अशी विनंती केली. कारण—सीकेपी समाजाशी दिघे यांचा जुना नातेसंबंध आणि गडावरील त्यांचा मान.
दिघे यांनी ऐकून घेतले आणि थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तासाभरामध्ये आम्ही सर्व मातोश्रीवर पोहोचलो. गडावरील मंडळींनी बाळासाहेबांना सविस्तर माहिती दिली. त्यांची मागणी स्पष्ट—एकविरा मंदिर संस्थानाचा कारभार शिवसेना बघावा.
बाळासाहेबांनी ती मागणी मान्य केली. परंतु दिघे यांनी स्वतःऐवजी अनंत तरे यांच्याकडे जबाबदारी सोपवावी, अशी नम्र विनंती केली—“मी यात अडकलो तर जिल्ह्याकडे दुर्लक्ष होईल.” शेवटी आठवड्याने परत यायला सांगून ते मंडळी रवाना झाली.

अनंत तरे यांचा ‘एकविरा संस्थान’ प्रवास
मातोश्रीवरून परतताना आम्ही मुलुंडला थांबलो. तेव्हा बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करणाऱ्या अनंत तरे यांना सर्व माहिती दिली आणि बाळासाहेबांनी मिळवून दिलेली जबाबदारी सांगितली.
हाच क्षण—अनंत तरे यांचा शिवसेनेत आणि एकविरा देवस्थानात प्रवेश.
त्यानंतर तरे यांनी नोकरी सोडली आणि जीवन एकविरा सेवेला वाहिले. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ संस्थानचा कारभार त्यांनी हृदयपूर्वक सांभाळला.
पहिले पाऊल—एकविरा गडावर बाळासाहेब ठाकरे यांना घेऊन जाणे. त्यांच्या हस्ते कारभाराचा शुभारंभ. यानंतर ठाकरेंचा गडावरील वावर वाढला आणि एकविरा ही ठाकरेंची देवी म्हणून प्रसिद्धीस पावली.
पूर्वी ठाकरे कुटुंब दरवर्षी डहाणू–कासा येथील महालक्ष्मीचे दर्शन घेत असे. पण एकविरा दर्शन हा कुटुंबाचा आध्यात्मिक आधार बनला—“गडावर गेल्यावर मनाला वेगळेच बळ मिळते,” असे ते स्वतः सांगत.

एकविरा — मुळ स्थान, इतिहास आणि पौराणिक स्थान
एकविरेचे मूळ स्थान रायगड जिल्ह्यातील वेरळ येथे आहे. तेथेही ठाकरे कुटुंब दर्शनाला अनेकदा गेले. त्यामुळे “ठाकरेंची देवी म्हणजे एकविरा” ही संकल्पना राज्यभर आणि देशभर पसरली.
एकविरा गडाजवळ असलेल्या कार्ला लेणींचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. एकविरा मूर्ती स्वयंभू पाषाणाची — नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध. पौराणिक कथा सांगते—वनवास काळात पांडवांसमोर देवी प्रकट झाली, एका रात्रीत देऊळ बांधण्याची अट ठेवली आणि प्रसन्न होऊन त्यांना “अज्ञातवासात ओळख लागू नये” असा वर दिला.
सीकेपी समाज आणि एकविरा गड
सीकेपी समाजाचा गडावरील वावर अत्यंत प्राचीन आहे—१७००–१८०० च्या दस्तऐवजांपासून त्याचा उल्लेख आढळतो. पूर्वी गडावर त्यांची धर्मशाळा होती. अनेक लग्न, व्रतवैकल्य, समारंभ होत असत. नंतर दुर्लक्षामुळे धर्मशाळा शासन ताब्यात गेली.
गडावर आजही शिलालेख आहे—
१८६६ साली सीकेपी भक्त बाबुराव कुलकर्णी यांनी नागू पोसू वरळीकर आणि हरिप्पाचेर नाखवा यांच्या मदतीने देऊळाचा जिर्णोद्धार केला.
(शिलालेखाचे तपशील लेखाच्या शेवटी दिले आहेत.)
ठाकरेंची एकविरा — देशभर प्रसिद्ध
नव्वदीच्या दशकातील एक आठवण विशेष—
कोलकात्यातील एका कार्यक्रमात सीकेपी/कायस्थ हे सांगितल्यावर अनेकांना अर्थ कळत नव्हता. तेव्हा एक सुशिक्षित महिला उत्स्फूर्तपणे म्हणाली, “अरे, वो बाल ठाकरेवाले सीकेपी कायस्थ हैं… एकविरा उनकी देवी है!”
ठाकरेंमुळे एकविरा देशभर ओळखली जाऊ लागली.
सुविधा, अडचणी आणि भविष्यातील योजना
गडावरील पायऱ्या वृद्ध भक्तांना अवघड जातात. तरे यांच्या आमदार निधीतून रस्त्याचे काम झालं. रोप-वेची योजना आदित्य ठाकरे यांनी पर्यटनमंत्री असताना मंजूर केली—निधीही राखून ठेवला. काही स्थानिकांच्या विरोधामुळे अडथळे आले, पण आता प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
ज्यांच्या कुलदेवतेचा गड — त्यांनाच स्थान नाही!
सीकेपी समाजाची कुलदेवता असूनही विश्वस्त मंडळात समाजाला स्थान नाही.
अनंत तरे यांनी संस्थानची अयोग्य घटना बदलण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या; ज्येष्ठ विधीज्ञ अजित ताम्हाणे हे काम पाहत आहेत. परंतु तरे यांच्या निधनानंतर पाठपुराव्याचा वेग मंदावला आहे.
२०१७ पासून गडावर ‘एक दिवस कायस्थांचा’ उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो—यामुळे पूर्वी विखुरलेला समाज एकत्र आला आहे. यंदापासून सीकेपी समाजाची वास्तू उभारण्याची तयारीही सुरू होत आहे.
शिलालेख (अनुवाद)
एकविरा भवानीचे जुने देवालय
सीकेपी भक्त बाबुराव कुलकर्णी यांच्या विचाराने, नागू पोसू वरळीकर आणि हरिप्पाचेर नाखवा (मुंबई)
यांनी धर्मार्थ बांधले.
दिनांक: माघ शुद्ध ५, शके १७८८ (फेब्रुवारी १८६६)
(छायाचित्र: संकेत कर्णिक)

