मुंबई: विले पार्ले पश्चिम येथील प्रेम नगर वसाहत ही मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या भूखंडावर आहे. या भागातील मलनिःसारण वाहिनी, नाला सफाई, शौचालय दुरुस्ती, जलवाहिनी आदी मूलभूत सुविधांसाठी जर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) परवानगी देत नसेल, तर महापालिकेने एसआरएला दिलेली ना-हरकतच रद्द करावी, अशी मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी प्रेम नगर येथील नागरिकांना येणाऱ्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
डीएचएफएल घोटाळ्यामुळे पुनर्वसन योजना ठप्प, नागरिकांचे हाल
प्रेम नगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन योजना डीएचएफएल घोटाळ्यामुळे रखडल्याने येथील रहिवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुनर्वसनही होत नाही आणि मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. गेल्या काही वर्षांपासून येथे मलनिःसारण वाहिनी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र महापालिका आणि एसआरए एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने काम रखडले होते. मात्र, आजच्या पाहणी दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम करण्यास सहमती दर्शवली.
१० दिवसांत जलवाहिनीचे काम सुरू होणार
येथील ९ इंच जलवाहिनीचे काम अर्धवट सोडले गेले होते. हे काम येत्या १० दिवसांत सुरू करण्याचे जलअभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसेच शौचालयांच्या दुरुस्तीसाठी आधी तयार करण्यात आलेला आराखडा सोयीचा नसल्याने काम रखडले होते. हा आराखडा बदलून आठवडाभरात काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सांडपाणी व्यवस्थापनावर तोडगा
या भागात सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. परिणामी, वस्तीतील पडीक इमारतीच्या तळघरात (बेसमेंट) पाणी साठते. हे पाणी पंपद्वारे जवळील नाल्यात सोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, एसआरएने ना-हरकत न दिल्याने पंप सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वीजजोडणी मिळत नाही. जर एसआरएच्या ना-हरकतीमुळे रहिवाशांचे हाल होत असतील, तर महापालिकेने एसआरएला दिलेली ना-हरकतच रद्द करावी, अशी ठाम मागणी आमदार पराग अळवणी यांनी केली.