आमदार निरंजन डावखरे यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन
ठाणे: शहापूर नगरपंचायतीच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी मंगळवारी ठाणे येथे गिरीश महाजन यांची भेट घेऊन नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी देण्याची मागणी केली.
शहापूर नगरपंचायत महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार स्थापन झाल्यानंतर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र सन १९८३ मधील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य ठरल्याने नागरिकांना पुरेसे व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे कठीण झाले आहे. शहराची भावी वाढ लक्षात घेता ही योजना अपुरी पडत असल्याचे आमदार डावखरे यांनी निवेदनात नमूद केले.
सन २०४४ पर्यंतच्या पाण्याच्या गरजा विचारात घेऊन भातसा नदी या स्त्रोतावर आधारित नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेसाठी शहापूर नगरपंचायतीने आवश्यक ठराव करून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून, काही खासगी प्रकल्पांचे पाणी आरक्षण रद्द झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुमारे २.५७ दलघमी प्रतिवर्ष पाणी आरक्षण शहापूर नगरपंचायतीस देण्याचा प्रस्ताव सध्या प्रलंबित आहे.
हा प्रस्ताव अत्यंत लोकहिताचा असल्याने त्यास तातडीने मंजुरी देऊन पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.
यावर मंत्री गिरीश महाजन यांनी विषयाची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहापूर शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला.

