मुंबई: सौर ऊर्जा पॅनल उभारण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांजवळील गायरान जमीन अत्यल्प मोबदल्यावर खाजगी कंपन्यांना दिली जात आहे. ही गायराने अनेक ठिकाणी दलित समाजाच्या ताब्यात आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबांची कुड, पाचट, पत्रा यांनी बांधलेली घरे बुलडोझरने पाडली जात आहेत. पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेदखल करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील घाटनांदूर, उजणी, बर्दापूर, बाभळगाव, जवळगाव, उंदरी, उमराई, केंद्रेवाडी आणि कोळपिंपरी या गावांमध्ये खाजगी सौर ऊर्जा कंपन्यांच्या हितासाठी पोलीस संरक्षणात अशा कारवाया करण्यात आल्या आहेत.
या अमानुष कारवाईच्या विरोधात जवळगाव (आंबेजोगाई) येथे दलित कुटुंबांनी गेल्या दीड महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी जेसीबी चालवत दलितांच्या घरांवर थेट हल्ला करण्यात आला. या अमानुषतेमुळे हतबल झालेल्या तीन आंदोलकांनी विष प्राशन केले असून त्यांच्यावर आंबेजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने संबंधित तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी अशा कोणत्याही कारवाईची माहिती नसल्याचे सांगितले. अशावेळी पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून देण्यात आले, हा गंभीर प्रश्न पक्षाने उपस्थित केला आहे.
पक्षाचे राज्य कमिटी सदस्य डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांची भेट घेतली, विष प्राशन केलेल्या आंदोलकांना धीर दिला आणि आपला ठाम पाठिंबा जाहीर केला.
राज्य सरकारने गायरान जमिनीवर कसणाऱ्या कुटुंबांना हक्काचे मालक करावे, त्यांच्या घरांची जमीन त्यांच्या नावावर करून द्यावी, आणि गरीब दलित कुटुंबांवर चालवलेल्या या अन्यायकारक कारवाया तातडीने थांबवाव्यात. संबंधित खाजगी कंपन्यांवर तसेच त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत आहे.