ताज्या बातम्या पाकिस्तान डायरी

इम्रान खान, गोपनीय कागद आणि शह – काटशह

X: @therajkaran

इम्रान खान पाकिस्तानचे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते. वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ख्याती होती. नव्या चेंडूबरोबरच ते जुना चेंडूही तितक्याच उत्तम रीतीने ‘स्विंग’ करत असत. फलंदाजी करताना त्यांचं ‘टायमिंग’ अचूक असे. राजकारणात त्यांना सुरुवातीला टायमिंग साधता आलं. नंतर मात्र त्यांची गाडी रुळावरून घसरली. एक चूक इम्रानला खूप महागात पडली. 

पाकिस्तानचे पंतप्रधान असताना इम्रान खान (Pakistan’s former PM Imran Khan) 24 फेब्रुवारी 2022 या दिवशी मॉस्कोत (Moscow) दाखल झाले. ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत रशियाशी (Russia) नवे करार करण्याच्या उद्देशाने ते मॉस्कोला गेले होते. जवळपास दोन दशकानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान रशियाच्या भेटीवर गेले होते. मात्र, त्याच दिवशी इम्रान आणि त्यांचे अधिकारी हॉटेलमध्ये स्थिरावत नाहीत तोवर रशियाने युक्रेनशी युद्ध (Russia – Ukraine War) करत असल्याची अधिकृत घोषणा केली. रशिया- युक्रेन युद्धात अमेरिका युक्रेनच्या (USA supports Ukraine) बाजूने आहे. इम्रानने तातडीने पाकिस्तानात परत जावं, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. मात्र, इम्रान यांनी रशियाचा दौरा पूर्ण केला आणि मगच ते पाकिस्तानात परतले. 

अमेरिकेचे इतर मित्र राष्ट्र युक्रेनच्या बाजूने उभे असताना इम्रान यांनी या युद्धात भारताप्रमाणेच तटस्थ भूमिका घेतली. अमेरिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानने अमेरिकेच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या होत्या. अमेरिकेला याचा राग येणं स्वाभाविक होतं. यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव (no-confidence motion against Imran Khan) मंजूर झाला. त्यानंतर त्यांना पायउतार व्हावं लागलं आणि काही दिवसांतच त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकण्यात आलं (Imran Khan sentenced to jail in corruption charges). 

याच काळात अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने एक सनसनाटी बातमी प्रसिद्ध केली. इम्रान खान यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झालेला आपल्याला आवडेल, असं विधान अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलं होतं. त्यांची तशी इच्छा होती, असं या बातमीत नमूद केलं होतं. यासंदर्भात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी इम्रान यांना अधिकृतपणाने कळवलंदेखील होतं. आपलं सरकार पाडण्यात अमेरिकेला रस होता आणि सरकार जाण्यात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभागदेखील असावा, असा आरोप करत इम्रान खान यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्याकडे यासंदर्भात अधिकृत कागद आहेत, अशी त्यांच्या विरोधकांना शंका आहे. 

इम्रान सध्या तुरुंगात आहेत आणि ते अधिकृत कागद गहाळ झाले आहेत. ते कागद कुठे आहेत हे कुणालाच माहीत नाही. इम्रान म्हणतात ते कागद परराष्ट्र खात्याकडे सुरक्षित आहेत, तर त्यांचे विरोधक म्हणतात ते कागद इम्रान यांनी कुठेतरी दडवून ठेवले आहेत. सध्या पाकिस्तानच्या न्यायालयात या संदर्भात एक खटला सुरू आहे. इम्रान यांनी ते गोपनीय कागद (confidential documents) सादर करावे, अशी सरकारची मागणी आहे. हे कागद समोर आले तर गोपनीय कागद दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली इम्रान यांना आणखी काही काळ तुरुंगात सडवत ठेवण्यासाठी पाकिस्तान सरकारचा आटापिटा सुरू आहे. याउलट हे कागद समोर येऊ नयेत म्हणून इम्रान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. जनतेची सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रकरणात 12 डिसेंबर ला न्यायालयापुढे सरकार आपली बाजू मांडणार आहे. न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सगळ्या पाकिस्तानचं लक्ष लागून आहे. 

क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरीस इम्रान खान (cricketer Imran Khan) गोलंदाजीपेक्षा फलंदाजी जास्त वेळ आणि जास्त जोमाने करत असत. त्यांची फलंदाजीची सरासरीदेखील त्या काळात खूप चांगली होती. राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस इम्रान यांनी तोच हातखंडा अवलंबलेला दिसत आहे. विरोधकांवर आक्रमकपणाने तुटून पडणारे इम्रान सहानुभूती मिळवून जनतेच्या मनात हिरो होऊ पाहत आहेत. पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक (General election in Pakistan) सहा महिन्यांवर आली आहे. त्यांचा हा पवित्रा कितपत यशस्वी ठरतो हे काही दिवसांनी स्पष्ट होईल. 

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज