मुंबई
निवृत्त होऊन तीन – चार वर्षे उलटूनही सेवानिवृत्तीच्या लाभासोबत पेन्शन न मिळाल्याने महापालिका आणि बेस्टच्या कर्मचारी, कामगार आणि अभियंत्यांनी आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे.
आंदोलनात महापालिका आणि बेस्टचे जवळ जवळ ५० कर्मचारी, कामगार आणि अभियंते सहभागी झाले आहेत. सर्व आंदोलनकर्ते हे तीन चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत.
निवृत्त होऊन सेवा निवृत्तीचा लाभ मिळालेला नाही, सोबत पेन्शन ही सुरु झालेली नाही. आम्हाला केवळ आमचे प्रॉव्हीडंट फंडातील जमा रक्कम देण्यात आलेली आहे. यापलिकडे एकही रक्कम मिळालेली नाही, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे कुठलीही पेन्शन आणि त्याचे लाभ मिळालेले नाहीत. शासनाच्या २०१९ च्या परिपत्रकाचे असून या परिपत्रकाचा वापर व्यवस्थित न केल्यामुळे सर्व अडचणी निर्माण झालेल्या आहेत. यानंतर १४ डिसेंबर २०२२ चे परिपत्रक निघूनही त्याचे पालन केले जात नसल्याने आम्ही निवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिलेलो आहोत, अशी त्यांनी तक्रार केली.
त्यामुळे प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष देऊन आम्हाला सेवा निवृत्तीचा लाभासोबत पेन्शन सुरु करावी, अन्यथा आमचे बेमुदत आंदोलन सुरु राहील, असा इशारा आंदोलकर्त्यांनी दिला आहे.