मुंबई ताज्या बातम्या

‘इथेच टाका तंबू’ नाटकाची मुंबईतील नाट्यरतन राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची पहिली निर्मिती  

नाशिक — यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे निर्मित ‘इथेच टाका तंबू’ या दोन अंकी प्रायोगिक नाटकाची मुंबईत होणाऱ्या ‘नाट्य रतन’ या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. पद्मविभूषण रतन टाटा यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव २५ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला असून, या नाटकाचा प्रयोग शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सादर होणार आहे.

‘इथेच टाका तंबू’ या नाटकाचे लेखन विद्यापीठ ललित कला केंद्राचे प्रा. दत्ता पाटील यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी श्री. सचिन शिंदे यांनी सांभाळली आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, शास्त्रोक्त शिक्षण-प्रशिक्षण आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने विद्यापीठात ललित कला केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमांसह सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देण्यासाठी आणि नाट्यशास्त्र शिक्षणक्रमाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना नामांकित कलावंतांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळावी या हेतूने या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.

नाट्य रतन महोत्सवात महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील एकूण १२ हिंदी, मराठी आणि इंग्रजी नाटके सादर केली जाणार आहेत.

पाटील–शिंदे जोडीचे नवे प्रायोगिक नाटक

लेखक प्रा. दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यांची हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, कलगीतुरा, दगड आणि माती, गढीवरच्या पोरी यांसारखी अनेक प्रायोगिक नाटके महाराष्ट्रात तसेच राज्याबाहेरही गाजली आहेत. ‘इथेच टाका तंबू’ हे नाटक एका वेगळ्या सामाजिक विषयाला हात घालत रंगभूमीवर सादर होत आहे.

या नाटकात ओंकार गोवर्धन, अमेय बर्वे, अश्विनी कासार आणि उमेश जगताप यांच्या भूमिका आहेत. नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, रंगमंच व्यवस्था यांसह निर्मितीच्या सर्व तांत्रिक बाजू विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळल्या आहेत. या नाटकाचा नाशिकमधील प्रयोग रविवार, २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणार आहे.

या नाटकाची राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठी निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आनंद व्यक्त करत ललित कला केंद्राचे अभिनंदन केले आहे.

विद्यापीठाच्या लौकिकात भर – कुलगुरू

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, नाट्यविषयक शिक्षणक्रमाला चालना देणारे आणि विद्यापीठाच्या नावलौकिकात भर घालणारे हे प्रायोगिक नाटक आहे. ललित कला केंद्राच्या माध्यमातून नाटकासह लोककला, संगीत आणि नृत्य क्षेत्रातही भक्कम पाठबळ उभे करून विद्यार्थी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये होणाऱ्या प्रयोगांमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार होईल.

ललित कला केंद्राची ही पहिलीच निर्मिती असून लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांना स्पर्धात्मक रंगभूमीवर प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची मोठी संधी मिळणार आहे. औपचारिक कला शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज