जळगाव – जळगावच्या जामनेर तालुक्यात १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम रंगणार आहे. “शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम” या संदेशासह ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ अंतर्गत देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे यांसह भारतातील नामांकित पैलवान आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंच्या विरुद्ध लढणार आहेत.
या महासंग्रामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऑलिम्पिक विजेता रवी कुमार दिया, ऑलिम्पियन नरसिंग यादव, तसेच कॉमनवेल्थ विजेता राहुल आवारे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कुस्तीप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
महिला कुस्तीला विशेष सन्मान
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” अभियानांतर्गत ५० महिला पैलवानांच्याही कुस्त्या होणार आहेत. याशिवाय, स्पर्धेचा प्रारंभ आणि समारोप महिलांच्या कुस्त्यांनी होणार आहे, असा सन्मान कुस्तीच्या इतिहासात प्रथमच दिला जात आहे.
महिला कुस्तीतील प्रमुख लढती:
• ट्रिपल महाराष्ट्र केसरी भाग्यश्री कोळी वि. युरोपियन चॅम्पियन मार्टा पाजूला (एस्टोनिया)
• महिला महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी वि. रोमानियन ऑलिम्पियन कॅटालिना क्सेन्ट
९ देशांचे पैलवान आमनेसामने!
या महासंग्रामात ९ देशांतील नामवंत मल्ल सहभागी होत आहेत. यात भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया, एस्टोनिया, इराण, ब्राझील आणि जॉर्जिया या देशांचे ऑलिंपियन, जागतिक विजेते आणि राष्ट्रीय विजेते पैलवान सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विशेष लढती:
• महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ वि. आशियाई पदकविजेता जलाल म्हजोयूब (इराण)
• उप-महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड वि. युरोपियन चॅम्पियन फ्लोरिन ट्रिपोन (रोमानिया)
• डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे वि. वर्ल्ड चॅम्पियन गुलहिर्मो लिमा
• सिकंदर शेख (महाराष्ट्र केसरी) वि. युरोपियन चॅम्पियन घेओघे एरहाण (मोल्दोवा)
• हर्षवर्धन सदगीर (महाराष्ट्र केसरी) वि. इमामुक (वर्ल्ड चॅम्पियन – जॉर्जिया)
विजेत्यांसाठी बंपर बक्षिसे!
स्पर्धेतील विजेत्यांना मोठ्या रोख पारितोषिकांसह मानाची गदा आणि ‘देवाभाऊ केसरी’ हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान केला जाणार आहे.
ही स्पर्धा रविवार, १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला जागत, या ऐतिहासिक कुस्ती दंगलीचा साक्षीदार होण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.