मुंबई – “महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम” या नावाने सादर केलेल्या नव्या विधेयकावर आता तीव्र राजकीय आणि सामाजिक वाद उफाळला असून, हे विधेयक लोकांच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी आणले गेले आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. हे विधेयक लोकशाही मूल्यांचा अपमान करणारे असून, त्याच्या विरोधात येत्या ३० जून रोजी आझाद मैदानावर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात जोरदार मोर्चा निघणार आहे.
या विधेयकात “अर्बन नक्षलवाद” ला आळा घालण्याचा उल्लेख असला, तरी ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणजे नेमके कोण? याबाबत कुठलीही स्पष्ट व्याख्या नाही. यामुळे सरकारविरोधी मत मांडणाऱ्या नागरिकांनाही या कायद्याअंतर्गत टार्गेट करता येणार आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
विधेयकात दिलेल्या तरतुदींनुसार, सरकार किंवा सार्वजनिक यंत्रणांवर टीका करणे, शांततापूर्ण आंदोलन करणे, किंवा सरकारी निर्णयाला विरोध करणे देखील “बेकायदेशीर कृत्य” ठरवले जाऊ शकते. “बेकायदेशीर संघटना” ही संकल्पनाही इतकी व्यापक आणि अस्पष्ट ठेवण्यात आली आहे की, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटना, पत्रकार, लेखक अशा अनेकांना त्याअंतर्गत कारवाईचा धोका निर्माण होतो.
या विधेयकामुळे: सामान्य नागरिकांवर संशयाच्या आधारे कठोर कारवाई करता येणार आहे. सरकारला न्यायव्यवस्थेतही हस्तक्षेप करण्याचे अप्रत्यक्ष अधिकार मिळतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, आणि न्याय्य सुनावणीचे मूलभूत अधिकार धोक्यात येऊ शकतात.
या कायद्यातील तरतुदी हुकूमशाहीच्या दिशेने झुकणाऱ्या असून, महाराष्ट्रातील लोकशाही, सामाजिक चळवळी आणि विचारमंथनाच्या परंपरेवर गदा आणणाऱ्या आहेत, असे स्पष्ट मत संविधान प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
याच विरोधात ३० जून रोजी विधानभवनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर ‘जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती’च्यावतीने भव्य मोर्चा आणि निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.
या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अबू आझमी यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
संघर्ष समितीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “हा लढा सरकारच्या मनमानीविरुद्ध आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे. त्यामुळे प्रत्येक संविधानप्रिय, विचारस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनात सामील व्हावे.”