मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शनिवारी अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा सादर करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जून महिन्यात झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातच त्यांनी याचे संकेत दिले होते.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदावर पक्षाचे ज्येष्ठ नेते, माथाडी कामगार संघटनेचे प्रभावी नेतृत्व करणारे, तसेच विधान परिषदेचे आमदार आ. शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांनी ही नियुक्ती केली असून येत्या मंगळवारी शिंदे नवे पदभार स्वीकारणार असल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले.
जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत झालेल्या घसरणीनंतर शरद पवार यांनी पक्षात मोठ्या फेरबदलांचे संकेत दिले होते. त्यातच जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना अलीकडेच उधाण आले होते. अजित पवार यांच्या बंडाच्या वेळीही गटबाजीच्या आरोपांमध्ये जयंत पाटील यांच्या भूमिका चर्चेत आल्या होत्या, आणि हीच गटबाजी त्यांच्या राजीनाम्याचे एक कारण ठरल्याचे बोलले जाते.
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिंदे हे कुशल संघटक म्हणून ओळखले जातात. त्यांचा हजरजबाबी स्वभाव आणि कामकाजातील आक्रमक शैली ही पक्षासाठी प्रभावी ठरू शकते, असा पक्षाचा विश्वास आहे.
आता जयंत पाटील पुढे काय भूमिका घेतात आणि शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाची दिशा कशी ठरते, याकडे राज्याच्या राजकारणात रस घेणाऱ्यांचे लक्ष लागले आहे.