मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) च्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महाराजांच्या युद्धनीतीवर आधारित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
‘बाळासाहेब भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, मराठी भाषेला राजकारणापेक्षा कृतीने सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत आहे. या निर्णयामुळे दिल्लीच्या तख्तावर मराठी शौर्याचा डंका वाजेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांतर्गत कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती केंद्राची उभारणी व छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण व सामरिक अध्यासन केंद्राची पायाभरणी करण्यात आली आहे. लवकरच दिल्लीतील मराठी भवनासाठीही अर्थखात्याला आराखडा सादर केला जाणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.