मुंबई: मराठी पत्रकारितेतील दीर्घ व तेजस्वी योगदानाची दखल घेत मुंबई मराठी पत्रकार संघाकडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार यंदा ज्येष्ठ पत्रकार आणि संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम यांना जाहीर झाला आहे. आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड झालेल्या कदम यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रु. ११,०००/- रोख रकमेच्या सन्मानाने गौरव केला जाणार आहे. हा पुरस्कार आचार्य अत्रे यांच्या कन्या श्रीमती शिरीष पै यांच्या देणगीतून दिला जातो.
कुमार कदम यांना वृत्तपत्र क्षेत्रात तब्बल ५४ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनी विद्यार्थी दशेतच पत्रकारितेची सुरुवात केली. ‘लोकसत्ता’च्या रविवार पुरवणीतील ‘ज्ञानमंदिरातील लाचखोरांना आवरा’ या धक्कादायक लेखातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर थेट प्रहार केला होता. शाळांमधील सक्तीच्या देणग्यांविरोधात आवाज उठवणारे ते पहिले पत्रकार होते.
१९७२ मध्ये रत्नागिरी येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘दैनिक रत्नभूमी’तून त्यांच्या पूर्णवेळ पत्रकारितेला प्रारंभ झाला. मुंबईतील वार्ताहर म्हणून त्यांनी एक दशकभर रत्नभूमीसाठी कार्य केले. त्याच दरम्यान ‘साप्ताहिक मार्मिक’मध्ये त्यांनी महापालिकेवरील ‘एक नजर’ हे स्तंभलेखन लोकप्रिय केलं. आणीबाणीनंतर त्यांनी ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेत १२ वर्षे काम करताना भाषिक माध्यमांतील नावलौकिक कमावला.
१९९९ मध्ये ‘महाराष्ट्र वृत्त सेवा (महावृत्त)’ या संस्थेची स्थापना करून त्यांनी ‘महावृत्त डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या मुख्य संपादकपदाची धुरा सांभाळली. ‘पुढारी’ (कोल्हापूर) आणि ‘तरुण भारत’ (बेळगाव) या दैनिकांचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी मुंबईत कार्य केले.
दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘मराठी मुलखात कोकण’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. जुलै २००१ ते सप्टेंबर २०१४ या १३ वर्षांच्या कालखंडात सलग साप्ताहिक स्तंभलेखन करत त्यांनी महानगरातील प्रमुख वृत्तपत्रात एखाद्या प्रांतिक विषयावर सातत्याने लिहिण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. २२ ऑगस्ट २००५ च्या लेखात त्यांनी ‘महामुंबईचे महाजाळ’ या शीर्षकातून रायगड जिल्ह्यातील सेझ प्रकल्पांचा संभाव्य धोका मांडून या विषयावर पहिला प्रकाश टाकला होता.
सध्या ते अवयवदान विषयक जनजागृतीचे राज्यस्तरीय काम करीत आहेत, तसेच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.
१९८३ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रमांची उपेक्षा थांबवण्यासाठी त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. सुधीर फडके यांच्यासह अनेक दिग्गज या मोर्चात सहभागी झाले होते. या लढ्यानंतरच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मराठी कार्यक्रमांना प्राधान्य मिळू लागले.
मराठी पत्रकारितेसाठी झटणाऱ्या कुमार कदम यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मिळणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील एक मोलाचा सन्मान ठरणार आहे.