मुंबई –महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या व वादग्रस्त ठरलेल्या जनसुरक्षा (असुरक्षा) विधेयकावर विरोध करण्याची पद्धतच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. डेमोक्रॅटिक सोशलिस्ट आणि माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विधानसभेतल्या विरोधी पक्षांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केला आहे.
कपिल पाटील म्हणाले, “असुरक्षा विधेयकाचा विरोध आझाद मैदानात किंवा प्रेसच्या बूमसमोर नव्हे, तर जनतेने निवडून दिलेल्या विधिमंडळाच्या सभागृहात करायचा असतो — मतदान करून आणि संयुक्त समितीत ‘डिसेंट नोट’ नोंदवून. सभात्याग म्हणजे सरकारला फुलटॉस देण्यासारखे आहे. विरोधी पक्षाचा हा नवा ब्रँड आता उघड झाला आहे.”
या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉ. विनोद निकोले यांच्या भुमिकेचं विशेष कौतुक करत म्हटलं, “ते अपवाद ठरले – त्यांना सलाम.”
पाटील यांनी शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांचाही उल्लेख केला. “ते आपल्या मर्यादेत का होईना, पण स्पष्टपणे बोलले,” असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीही जाहीर भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष म्हणजे, कपिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्वतः या दिग्गज विरोधी नेत्यांनी विधेयकाच्या प्रक्रियेत दिलेल्या सहकार्याबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले.
बातमीच्या शेवटी कपिल पाटील यांनी “नव हिंदुत्वाच्या प्रेमात पडलेली चळवळीतली लोक तरी आता भानावर येतील का?” असा सवाल उपस्थित केला आहे.