द्रास युद्धस्मारकातील ‘लाईट अॅण्ड साऊंड शो’साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार
मुंबई –कारगिल युद्धातील भारतीय जवानांचा शौर्यगाथा आणि त्याग आता पर्यटकांना थेट अनुभवता येणार आहे. द्रास युद्धस्मारक येथे लवकरच भव्य ‘लाईट अँड साऊंड शो’ सादर होणार असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत ३ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.
जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कारगिल विजयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘सरहद शौर्यथॉन २०२५’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच निमित्ताने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या शोची घोषणा केली होती. आता या शोची निर्मिती भारतीय लष्कराकडून सुरू करण्यात आली आहे.
युद्धात सैनिकांनी भोगलेल्या अत्यंत कठीण व दारुण परिस्थितीचा अनुभव सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा प्रभावशाली लाईट अँड साऊंड शो सादर करण्यात येणार आहे. २२ जून २०२५ रोजी महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी ३ कोटी रुपयांचा निधी लष्कराच्या ताब्यात दिला.
यासोबतच, २६ व्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने द्रास येथील जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन व इतर वैद्यकीय उपकरणे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ही माहिती सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी दिली.