Pakistan Diary
@therajkaran
पाकिस्तानातील दुसरे सर्वांत मोठे शहर असलेले लाहोर (Lahore) सध्या प्रदूषणाच्या गर्तेत फसले आहे. तब्बल दीड कोटी लोकसंख्या असलेल्या लाहोरमध्ये हवा विषारी झाली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये लाहोरच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 345 इतका होता. साधारणपणे हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 151 च्या वर असेल, तर ती हवा अशुद्ध मानली जाते. हाच निर्देशांक 300 च्या वर असेल तर ती हवा विषारी बनते. साहजिकच लाहोर हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर (most polluted city म्हणून घोषित झाले आहे.

रावी नदीच्या (Ravi river) तीरावर वसलेले लाहोर खरे तर प्राचीन शहर आहे. भगवान श्रीरामाचे (Lord Ram) पुत्र लव यांनी या शहराची स्थापना केली. त्यामुळे त्याला लाहोर असे नाव मिळाले. अखंड भारताच्या स्वातंत्र लढ्यात लाहोरचे मोठे योगदान होते. हे शहर पाकिस्तानची (Pakistan) सांस्कृतिक राजधानीदेखील आहे. पाकिस्तानचा सिनेमा उद्योग लाहोरमध्येच सुरू झाला आणि विस्तारात गेला. काही वर्षांपूर्वी हा सिनेमा उद्योग कराचीमध्ये (Karachi) स्थलांतरित झाला आहे. अमर्यादित आणि अस्ताव्यस्त उभे राहिलेले प्रदूषणकारी उद्योग, वीटभट्ट्या आणि वाहनांची अनियंत्रित संख्या यांमुळे लाहोरमध्ये प्रदूषण वाढतेच आहे.

प्रदूषण मोजणारी अवघी पाच केंद्रे असल्यामुळे सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश स्थानिक न्यायालयाने सरकारला दिले आहेत. सरकारने दहा वर्षांची कालबद्ध योजनादेखील मांडली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होईल की नाही याबाबत स्थानिकांना शंका वाटते. सध्या तरी प्रदूषणावर उपाय म्हणून शाळा, महाविद्यालयांना जानेवारी अखेरपर्यंत सुट्टी देणे आणि प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांकडून दंड गोळा करणे एवढीच उपायोजना सरकार करताना दिसत आहे.
प्रदूषण ही काही एकट्या लाहोरची समस्या नाही. संपूर्ण पाकिस्तानातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. शिकागो विद्यापीठाने (Chicago University) काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात पाकिस्तानातील हवा किती विषारी बनली आहे याची माहिती समोर आली होते. या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानातील 98.2 टक्के जनता अशुद्ध हवेत राहते. प्रदूषणामुळे पाकिस्तानी नागरिकांचे आयुर्मान सरासरी साडेतीन वर्षांनी कमी झाले आहे. हेच प्रमाण लाहोरमध्ये साडेचार वर्षे आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी पंजाब सरकारने गेल्या नोव्हेंबरमध्ये लाहोरमध्ये कृत्रिम पाऊस पाडला होता. अशा प्रकारचा हा पाकिस्तानमधील पहिलाच प्रयोग होता. त्यानंतर लाहोरमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200 च्या खाली आला.

कृत्रिम पावसाचा (Artificial rain) प्रयोग पुन्हा एकदा करण्यासाठी पंजाब सरकार सरसावले आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (United Arab Emirates) तज्ञांच्या मदतीने हा पाऊस पडला जाईल. त्यामुळे काही प्रमाणात प्रदूषणातून सुटका होईल. मात्र, हा तत्कालीन उपाय आहे. प्रदूषणावर कायमचे नियंत्रण मिळवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्याच लागतील.