मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची सफारी सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली.
आज पालकमंत्री शेलार यांनी उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सध्या उद्यानात वाघ आणि सिंह सफारी उपलब्ध आहेत. मात्र, बिबट्या सफारीसाठी साधारण 30 हेक्टर जागा आणि 5 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. पर्यटक वाढीस मदत होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावर मंत्री शेलार यांनी वनखात्याच्या तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रकल्पासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले आणि तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
“भारत-भारती” सिंहांना दत्तक
गुजरातमधून नुकतेच आणलेल्या “भारत” आणि “भारती” या तीन वर्षांच्या दोन सिंहांना पालकमंत्री आशिष शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले असून त्यांच्या देखभालीचा खर्च वैयक्तिकरित्या उचलणार आहेत.
411 वन कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 400 वन मजूर आणि मानववस्तीमध्ये प्राणी पकडणाऱ्या 11 सदस्यीय पथकाचा अद्याप विमा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंत्री शेलार यांनी तातडीने सुरक्षा विमा उतरवण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.