By विलास देशमुख
बोरिवली: दत्तपाडा फाटक्यापासून नॅशनल पार्क जास्त लांब नाही. नव्वदच्या दशकाची सुरुवात. मारुती मोटार बाजारात येऊन बरीच वर्ष झाली होती. त्या काळी मध्यमवर्गीय माणसाचे मोटार घेण्याचे स्वप्न असे. बहुतेक सगळे सेकंड हॅंड मोटारी घेण्यात रस दाखवीत. मनाची समजूत काढताना म्हणत, “आधी जुन्या मोटारीवर शिकून घेतो आणि नंतर नवी मोटार घेऊ.”
अशीच जुनी प्रीमिअर पद्मिनी मोटार मित्राने घेतली. ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस करायची बोरीवलीत काही ठिकाणं आहेत. त्यातलंच एक म्हणजे हायवेच्या पूर्वेला काजूपाड्याच्या पलीकडचा रस्ता. श्रीकृष्ण नगर ओलांडून पुढे अभिनव नगर उजवीकडे टाकल्यावर मशिद लागते. ती ओलांडली की डाव्या बाजूला टुमदार बंगले. सरळ रस्ता, तुरळक रहदारी. एक तीव्र उतार (उतार आणि चढणीवर मोटार चालवण्याची प्रॅक्टिस करायला उत्तम जागा). शेवटी उंच इमारती समोर रस्ता संपतो. उजव्या बाजूला नॅशनल पार्कचं कुंपण. त्या तारेच्या कुंपणापलीकडे सिंह सफारीचा उंच पिंजरा. छोटासा टेकडीसारखा उंचवटा चढून गेलं की लांब सिंह दर्शन होऊ शकतं. बरीच मंडळी हे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. नशीब चांगलं असेल तर पिंजऱ्यात जवळ बसलेल्या जंगलाच्या राजांचं दर्शन होऊ शकतं.
संध्याकाळची वेळ. मी, मित्र, त्याचे वडील आणि त्यांचा कुत्रा टॉमी, असे मोटारीतून निघालो. प्रॅक्टिस सुरू केली. बऱ्याच फेऱ्या मारल्या. रस्त्याच्या बाजूला मोटार पार्क करायची प्रॅक्टिस केली आणि आम्हीही टेकडीवरच्या कुंपणाजवळच्या गर्दीमध्ये सामील झालो. सफारीमधला सिंह पिंजऱ्याच्या पलीकडे लोळत पडलेला स्पष्ट दिसत होता. हे पाहताना मित्राला हातातला पट्टा ओढून टॉमीला मागे ओढावं लागत होतं. कारण टॉमीला समोरच्या पिंजऱ्यात त्याचाच कुणीतरी अनोळखी भाऊबंद दिसत होता. हा त्याच्यावर गुरगुरत होता. मोठमोठ्याने भुंकत होता. तावातावाने अंगावर धावून जात होता. पट्टा मित्राच्या हातात होता म्हणून तो कुंपणापर्यंत पोहोचू शकत नव्हता. “क्या डेरींगबाज कुत्ता है, शेर से भी नहीं डरता,” आजूबाजूच्या बघ्यांचे शब्द टॉमीला कळत नव्हते, पण मित्राच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला.
उंच कुंपणापलीकडचा सिंह मात्र शांतपणे डोळ्यांची उघडझाप करत होता आणि शेपटीने अंगावरच्या माशा हाकलत होता.
असे बरेच दिवस चालले होते. प्रॅक्टीस संपली की सिंह दर्शन. टॉमीचं सिंहावर भुंकणं आता जास्तच झालं होतं.
अशाच एका संध्याकाळी प्रॅक्टीस संपली. आणि आम्ही टेकडी चढून कुंपणाजवळ गेलो. आज बघ्यांची संख्या जरा जास्तच होती. नेहमीप्रमाणे टॉमीने भुंकायला सुरुवात केली. आज भुंकताना टॉमी एका जागेवर उभा नव्हता. इकडून तिकडे पळता पळता भुंकत होता. त्याच्या मागे पळता पळता मित्राला धाप लागत होती. पिंजऱ्याच्या पलीकडे सिंहाच्या बाजूला आज सिंहीण पण बसली होती.
बराच वेळ टॉमीचं भुंकणं ऐकल्यावर सिंहीण उठली, बाजूला जाऊन उभी राहिली. एकदा टॉमीकडे पाहिलं आणि एक नजर सिंहाकडे वळवली. बहुतेक सिंहीण आपल्याकडे तुच्छतेने पाहत आहे, हे सिंहाला कळलं. टॉमीचं भुंकणं सुरूच होतं.
सिंह उठला. आयाळ झटकली. एकदा सिंहीणीकडे पाहिलं. लगेच टॉमीच्या दिशेने पाहून डरकाळी फोडली. डरकाळी ऐकून बघ्यांची पळापळ झाली. मित्र पळाला, पाहतो तर काय — त्याच्या हातात फक्त टॉमीच्या गळ्यातला पट्टा, अर्धा तुटलेला. टॉमी तसा चपळ. सगळ्यांना मागे टाकून मोटारींच्या मागे जाऊन उभा. कसाबसा त्याला मोटारीत टाकून घरी आणलं. नेहमी सीटवर ऐटीत बसणारा टॉमी, आज सीटवर थरथरत उभा होता. शेपटी दोन पायांच्या मध्ये होती.
धावपळीत मी जरा मागे वळून पाहिलं. सिंहीण सिंहाच्या आयाळीशी लगट करीत होती. तीचं बोलणं मला स्पष्ट समजत होतं. म्हणत होती — “शाब्बास! ह्याच क्षणाची मी वाट पाहत होते. एवढे दिवस पलिकडच्या झुडुपाच्या मागून पाहत होते. हा कुत्रा तुझ्या राज्यात येऊन तुझ्यावर भुंकतोय.
अरे, हे गीरचं वाळवंट नाही. हा आहे महाराष्ट्र. आताच दाखवायला हवं सह्याद्रीच्या सिंहाचं तेज, नाहीतर हे कुत्रे तुझेही तुकडे करून भंगारात विकतील.
आज जर का तू काही हालचाल केली नसतीस तर, मी पिंजरा तोडून त्या कुत्र्याच्या नरडीचा घोट घेणार होते.”
एवढं बोलून सिंहीण झुडपाकडे निघून गेली. बाजूच्या झुडपातून दुसरा सिंह आला. हे दोघंही गळ्यात गळे घालून बागडू लागले. आता राज्य त्यांचंच होतं!
पुढच्याच आठवड्यात पुन्हा प्रॅक्टीसला जायचं ठरलं. मोटार, मित्र, मी आणि टॉमी. हायवेवर येऊन मोटार उजवीकडे वळली. प्रॅक्टीसचा परिसर इथून साधारण दीड-दोन किलोमीटरवर होता. प्राण्यांना आपण कुठे जाणार आहोत, हे बरंच आधी समजत असावं. मोटार नॅशनल पार्कच्या प्रवेशद्वाराजवळून जाऊ लागली. ट्रॅफिकमुळे स्लो झाली. ट्रॅफिकचा फायदा घेऊन टॉमीने उघड्या खिडकीतून बाहेर उडी मारली आणि धूम ठोकली. त्याला पाहण्यासाठी आम्ही गाडी वळवली. त्याचा कुठेही पत्ता नव्हता. शेवटी कंटाळून आम्ही घरी आलो.
टॉमी गेटवरच उभा दिसला. तोंडातून लाळसदृश फेस, जीभ बाहेर, छाती घाबरून धपापत होती. शेपटीची पोझिशन त्या दिवशीसारखीच. बिल्डिंगच्या गेटवर आमची वाट पाहत उभा होता. वॉचमन म्हणाला, “हा केव्हाचाच धावत आलाय आणि इथे उभा आहे. गेटच्या बाहेरही जात नाही.”
काही दिवसांनी मित्र भेटला. म्हणाला, “अरे, टॉमी गेला!”
“दोन दिवस काही खाल्लं नाही. पेट डॉक्टरांकडे नेला होता. डॉक्टर म्हणाले, ‘ह्याची अवस्था पाहून असं वाटतंय की हा खूप घाबरलेला आहे.’
काल गेला.”
ते ऐकून माझ्या डोळ्यांसमोर टॉमीचं सिंहावरचं भुंकणं आणि त्यानंतरची सिंहगर्जना कानात घुमू लागली. दुसऱ्या भागातून आलेला टॉमी, जंगलाच्या राजाच्या राज्यात जाऊन त्यांच्या अंगावर कारण नसताना उगाचच भुंकत होता. आपला माज दाखवत होता. शांत सिंहाने एकाच गर्जनेत त्याची ही अवस्था करून टाकली.
अशाच सिंहगर्जनेची सध्या महाराष्ट्रात गरज आहे!
— विलास देशमुख
बोरीवली, मुंबई
९८२०३७२६७१