महाराष्ट्र विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे, इतिहासाचे आणि संसदीय परंपरेचे दस्तावेजीकरण करणे ही अत्यंत जबाबदारीची आणि दीर्घदृष्टीची गोष्ट आहे. या कार्याला संस्थात्मक स्वरूप देत “लोकसेवेचा लोकजागर” हा संदर्भसमृद्ध ग्रंथ वाचकांसमोर आणण्यात आला आहे. या ग्रंथामागे वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक (अ.का.) निलेश मदाने यांचे परिश्रम आणि दृष्टी स्पष्टपणे जाणवते.
निलेश मदाने यांनी सक्रिय पत्रकारितेचा १२ वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर सन २००४ मध्ये विधानमंडळ जनसंपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी विधानमंडळाचा अमृतमहोत्सव (२०११–२०१२), नवनिर्वाचित सदस्यांसाठी संसदीय अभ्यासवर्ग, संसदीय कार्यप्रणालीतील बलस्थानांविषयी लेखन-व्याख्याने, माननीय पीठासीन अधिकाऱ्यांसाठी टिपणे, स्वीय सहाय्यकांसाठी लोकसंपर्क पुस्तिका, तसेच विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहातील महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन अशा विविध जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने पार पाडल्या.
विधानमंडळातील चर्चांचे कार्यवृत्त, राजकीय घडामोडी, महत्त्वपूर्ण संदर्भ आणि ऐतिहासिक घटनांचे सातत्याने दस्तावेजीकरण व्हावे, यासाठी त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. या ध्यासातूनच “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाची संकल्पना आकारास आली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळात आयोजित विशेष कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन झाले. हा ग्रंथ केवळ एक प्रकाशन नसून संसदीय परंपरेचे, राज्यघटनात्मक मूल्यांचे आणि लोकसेवेच्या भावनेचे दालन आहे.
या ग्रंथामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी प्रवासाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनासमितीसमोर केलेले ऐतिहासिक भाषण, नागपूर अधिवेशनात त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तचा अभिवादन प्रस्ताव, मराठवाडा मुक्ती संग्रामाची ७५ वर्षांची नोंद, माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचे मनोगत-मंथन, तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ संदर्भातील मा. मुख्यमंत्री यांचे अर्थसंकल्पाचे सुलभ विश्लेषण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अतिरिक्त अर्थसंकल्पावरील महत्त्वपूर्ण भाषण अशा अभ्यासपूर्ण संदर्भांचा समावेश आहे.
यामुळे विधिमंडळाचे सन्माननीय सदस्य, त्यांचे स्वीय सहाय्यक, पत्रकार, राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक यांना एकाच दृष्टीक्षेपात महत्त्वपूर्ण संदर्भ उपलब्ध होत आहेत. हा ग्रंथ केवळ माहिती देत नाही; तर संसदीय परंपरेची जाणीव आणि लोकशाही मूल्यांचा सन्मान जागवतो.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या याआधीच्या प्रकाशनांप्रमाणेच हे प्रकाशनही अभ्यासकांसाठी उपयुक्त, संदर्भग्रंथ म्हणून महत्त्वपूर्ण ठरेल, यात शंका नाही.
“लोकसेवेचा लोकजागर” हा केवळ पुस्तकाचा शीर्षक नसून लोकप्रतिनिधित्व, जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचा साक्षेपी दस्तावेज आहे — आणि त्या दृष्टीने तो काळाची गरज पूर्ण करणारा प्रयत्न ठरतो.


zoritoler imol
March 1, 2026Simply a smiling visitant here to share the love (:, btw outstanding layout. “Treat the other man’s faith gently it is all he has to believe with.” by Athenus.