आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांचे संकेत
महाड: कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी आगारातील शिवशाही बसेस वारंवार रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कालबाह्य व जुन्या झालेल्या या बसेसमुळे प्रवासादरम्यान अडथळे निर्माण होत असून प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिवशाही सेवा तातडीने बंद करण्याची मागणी महाडकरांकडून केली जात आहे.
या संदर्भात महाड आगार प्रमुख रितेश फुलपगारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वारंवार बिघाड होत असल्याचे मान्य केले. तसेच महिन्याभरात महाड आगारातून जुन्या शिवशाही बसेस बंद करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
महाड आगार हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच पुणे, सातारा आदी भागांतून येणाऱ्या बसेस येथे थांबतात. दररोज हजारो प्रवासी महाड आगारातून प्रवास करतात. सध्या महाड आगारातून मुंबई, पुणे व बोरिवली मार्गावर शिवशाही सेवा सुरू आहे.
मात्र प्रवासादरम्यान वातानुकूलित यंत्रणा बंद पडणे, तसेच बसेस रस्त्यातच थांबणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक वेळा प्रवाशांना शिवशाहीऐवजी साध्या एसटी बसने पुढील प्रवास करावा लागत असल्याने जादा तिकिटदर भरूनही अपेक्षित सुविधा न मिळाल्याची भावना प्रवाशांत आहे.
महाड आगारात सध्या सुमारे १० शिवशाही बसेस असून त्या दुरवस्थेत असल्याची माहिती आहे. आवश्यक सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) वेळेवर उपलब्ध होत नसल्याने दुरुस्तीमध्ये अडचणी येत असल्याचेही समजते.
प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवशाही सेवा बंद करण्याचा निर्णय प्रत्यक्षात येतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

